उंबरे बसस्थानक बनले टवाळखोरांचा अड्डा

0

अनधिकृत व्यावसायिकांचाही विळखा; विद्यार्थिनींची होतेय कुचंबना

उंबरे (वार्ताहर) – येथील बसस्थानक लगतच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानकाच्या समोरच बेशिस्त वाहनांच्या पार्किंग, नजिकच्या दुकानदारांचा बसस्थानकाला विळखा त्यामुळे बसस्थानकच बंद झाल्याने बाहेरगावी शिक्षणासाठी जाणार्‍या गावातील विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे.

त्यातच अनेक टारगट याच बसस्थानकात बसून विद्यार्थिनींची टवाळी करीत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. हे बसस्थानक टवाळखोरांचा अड्डा बनल्याने काही मुलींना शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे.

उंबरे, कुक्कडवेढे, मोरेवाडी, करपरावाडी, येथून सोनई व राहुरी महाविद्यालय परिसरातील 70 ते 80 विद्यार्थिनी शिक्षणासाठी जातात. त्यांना प्रवासासाठी बसची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, त्यासाठी त्यांना बसस्थानकात बसण्यासच काय पण उभे राहण्यास सुद्धा जागा उपलब्ध राहिलेली नाही. संपूर्ण बसस्थानकालाच अतिक्रमणधारकांनी वेढा घातला आहे.

हे अतिक्रमण काढण्यासाठी उंबरे ग्रामपंचायतीकडे विद्यार्थी व पालकांनी वारंवार मागणी करूनही त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवून सरपंच व सदस्य आणि प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. आपल्या सोयीच्या राजकारणासाठी गावपुढारीही अतिक्रमण काढण्यास पुढे येण्याचे धाडस करीत नसून फक्त हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून बघ्याची भूमिका घेत आहेत.

हे अतिक्रमण ग्रामपंचायतीने येत्या आठ दिवसांत विद्याथिनींसाठी रिकामे न केल्यास तरुण आंदोलन हाती घेऊन ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असून, तहसीलदारांना साकडे घालणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • बसस्थानकाजवळ उभ्या राहिलेल्या विद्यार्थीनींचे छायाचित्र, व्हिडीओ क्लिप काढण्याचे उद्योग काही टारगट तरूण करीत आहेत. त्यामुळे काही पालकांनी या विद्यार्थीनींची शाळाच बंद केल्याने केवळ बसस्थानकापायी शिक्षणावर पाणी सोडण्याची वेळ मुलींवर आली आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्त राहुरी पोलिसांनी करावा, अन्यथा आम्ही बंदोबस्त करण्यास सक्षम असल्याचे तरुणांनी सांगितले आहे.  

LEAVE A REPLY

*