Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राहाता – साकुरी परिसरात 5 ठिकाणी घरफोड्या

Share

5 लाखाहून अधिक ऐवजासह चारचाकी गाडीची चोरी

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता व साकुरी परिसरात एकूण 5 ठिकाणी घरफोड्या झाल्या असून यात चोरट्यांनी 5 लाखांहून अधिक ऐवजासह चारचाकी गाडी चोरून नेली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहाता शहरातील साईनगरमध्ये 3 ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कम, सोने, टिव्ही व वॅगनर कंपनीचे चारचाकी वाहन असा सुमारे पाच लाखांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

राहाता शहरातील चोरीच्या घटना काल शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य शिवाजी चौकालगत असलेल्या साईनगरमध्ये घडली. कापड व्यापारी प्रसाद खर्डे यांच्या बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाट उचकटून 60 हजार रुपये रोख, दोन तोळे सोन्याचे दागिने, लहान मुलांचे ड्रेस, साड्या व दारात लावलेली वॅगनर कंपनीचे चारचाकी वाहन असा सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या वॅगनर गाडीच्या चाव्या काढून सर्व माल त्या गाडीत टाकला. तसेच त्याच घरासमोर राहात असलेल्या शिर्डी येथील एका बँक मॅनेजरच्या बंद घरात प्रवेश करून दोन एलसीडी टिव्ही व काही सोनेही या चोरट्यांनी चोरून नेले. याच परिसरात आणखी एका घरात घुसून चोरी केल्याचे कळते. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये तीन तरुण चोरी करताना दिसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
त्याच रात्री साकुरी हद्दीतही या चोरट्यांनी तीन ते चार दुकाने फोडली असून तेथे त्यांनी आपल्या बरोबर आणलेल्या दोन मोटारसायकली तेथेच टाकून दिल्या होत्या.

त्या मोटारसायकली नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. राहाता व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची गस्त बंद झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी, मोबाईल चोरी व दुकान फोडण्याच्या घटनांचा समावेश आहे.
याप्रकरणी प्रिती प्रसाद खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पो. नि. सुभाष भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

राहाता शहर व परिसरात गेल्या 5-6 दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातील सोने लुटीचा प्रकारही वाढला आहे. पोलिसांनी तात्काळ या चोरीच्या घटनांचा तपास लावावा व रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त कायमस्वरुपी सुरू ठेवावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!