जिल्हा परिषदेच्या घारगाव शाळेची इमारत पडली

0

ग्रामस्थांचा गाव बंद, रास्तारोको

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – निंबोडी येथील शाळेची इमारत पडल्याची घटना ताजी असतांनाच श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कालरात्री अचानक पडल्याने मोठी हानी टळली. सुदैवाने ही घटना सोमवारी शाळा सुटुन गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी गावात बंद पाळून रस्ता रोको आंदोलन केले.
घारगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत ही स्वातंत्र्य पुर्व काळातील आहे. इमारतीला अनेव ठिकाणी तडे गेले असल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी जुनी इमारत पाडून नविन इमारत बांधण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने निधी नसल्याचे कारण देत नविन इमारतीला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली.
एवढेच काय तर घारगाव प्राथमिक शाळेच्या इमारतीची नोंद महसुल कडील मिळणार्‍या उतार्‍यावर नोंदच नसल्याने जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याच कारणाने या शाळेचे निर्लेखन प्रशासन दरबारी गेल्या 1 ते दीड वर्षांपासून रेंगाळत पडून आहे. म्हणून या शाळेचे निर्लेखन आजतागायत झालेले नाही. यामुळे नवीन शाळा खोल्यांना मंजुरी मिळालेली नाही. शासनाची मुख्यत्वे ही मालकी जिल्हा परिषदेकडे असताना देखील आजतागायत शाळा त्यांच्या दप्तरी नोंदविण्यास असमर्थता दर्शविली आहे.
याच शाळेचे बांधकाम निकृष्ट असल्याबाबत लेखी निवेदन प्रशासनाला व मंत्री महोदयांना 24 ऑगस्ट रोजीच पालक व ग्रामस्थांनी दिले होते. यासाठी 7 सप्टेंबर पासून शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यापूर्वीच काल पहाटे शाळेच्या इमारतीचा काही भाग पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावात बंद पाळून रस्तारोको आंदोलन केले.
यावेळी बबनराव पाचपुते म्हणाले, अशा घटना घडने ही प्रशासकीय दृष्टीने खेदाची बाब आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री यांच्या दुरध्वनीवरून चर्चा झाली असून मुख्यमंत्री यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून नविन इमारत बांधकामाला निधी मिळवून देवू. पंचायत समितीचे सभापती लगड यांनी पंचायत समिती स्तरावर नविन इमारतीचा प्रस्ताव सादर जिल्हा परिषदेकडे पाठविला असून निर्लेखन ताबडतोब करुन नवीन शाळा खोल्या इमारतीसाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यानंतर ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*