तोफखाना पोलीस ठाण्यातील लाचप्रकरण : ‘दहीफळे दादा’ला शोधण्यासाठी पोलीस संजय काळेला कोठडी

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने तोफखाना पोलीस ठाण्याचा कर्मचारी संजय बबन काळे यास पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. त्यास गुरुवारी (दि. 9) न्यायालयात हजर केले असता मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये दहीफळे दादा यांचा उल्लेख आहे. त्यामुळे हा दहीफळे कोण आहे, याचा शोध घेऊन चौकशी करावयाची आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने काळे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या 5 नोव्हेंबरला तोफखाना पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचार्‍यांनी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रोड येथे एका हॉटेलवर छापा टाकला होता. त्यात अवैध दारू विक्री प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले होते. मात्र याच प्रकरणात हॉटेल मालक व त्याच्या वडिलांना आरोपी करण्यासाठी पोलिसांनी डाव आखला. दरम्यान, आरोपी न करण्यासाठी काळे यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान तक्रारदार व काळे यांच्यात झालेल्या संभाषणात दहीफळे दादा असा उल्लेख आहे.
मात्र, पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना दहीफळे घटनास्थळी हजर नव्हते. त्यामुळे हे दहीफळे दादा कोण? त्यांची या गुन्ह्यात काय भूमिका आहे. तसेच या गुन्ह्यात अन्य कोणी कर्मचारी व अधिकारी यांचा संबंध आहे का? याचा तपास करणे आहे, आरोपीच्या आवाजाचे नमुने घेणे आहे. त्यामुळे काळे यास पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष सत्र न्यायाधीश नावंदर यांनी आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भविष्य निर्वाह निधी पथकाचे वरिष्ठ लिपिक (माध्यमिक) सुनील दादू सोनवणे (रा. सावेडी) याने एका सेवानिवृत्त मुख्यध्यापकांचे रजा रोखीकरणाचे बिल देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम त्याचे सहकारी लिपीक सुनील हरिभाऊ साबळे (जवाहर माध्यमिक विद्यालय चांदा, ता. नेवासा) याच्यामार्फत स्वीकारली होती. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली आहे.

पारदर्शी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी एका बैठकीत सर्व प्रभारी अधिकार्‍यांना सूचित केले होते. ज्या पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार होईल किंवा लाचलुचपत शाखेचा छापा पडेल त्याची बदली थेट नियंत्रण कक्षात केली जाईल, असे त्यांनी स्पष्टच बोलून दाखविले होते. ते वाक्य सार्थ ठरवीत शर्मा यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पांडुरंग पवार यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यामुळे ‘जैसा बोले तैसा चाले’ असेच काहीसे पोलीस अधीक्षक शर्मा यांचे काम आहे.

LEAVE A REPLY

*