Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यायोगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; दिग्गजांची लखनौत मांदियाळी

योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; दिग्गजांची लखनौत मांदियाळी

दिल्ली | Delhi

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) सलग दुसर्‍यांदा बहुमत मिळवत भाजपाने (BJP) ऐतिहासिक विजय साकारला. आज योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. योगी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत.

- Advertisement -

शपथविधी सोहळा (Yogi Adityanath Oath Ceremony) भव्यदिव्य करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. लखनौच्या (Lucknow) एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (BRSABV Ekana Cricket Stadium) हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले असून, यामधील काही नावांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगू लागली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या शपधविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांपासून उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. भाजपाचे सर्व मोठे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण दिले गेले आहे. काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा (Priyanka Gandhi Vadra), खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), बसपाच्या (BSP) अध्यक्ष मायावती (Mayawati), सपाचे (SP) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav), सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्यासह इतर नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. योगी यांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसीच्या लोकांसह ५० पेक्षा अधिक संतांना निमंत्रण दिले आहे.

दुसरीकडे, मुकेश अंबानी (Mukesh Ambani), गौतम अदानी (Gautam Adani), आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यासह इतर मोठे उद्योगपतीही योगींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या सोहळ्याच्या पृष्ठभूमीवर राजधानी लखनौमध्ये प्रचंड प्रमाणात फलके लावण्यात आले आहेत. योगी यांचा शपथविधी पाहण्यासाठी भाजपाचे राज्यभरातून ४५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

तसेच योगी आदित्यनाथांच्या शपथविधी समारंभासाठी सिनेसृष्टीतील कलावंतांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यात अक्षयकुमार, कंगना राणावत, बोनी कपूर आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सध्या गाजत असलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’च्या (The Kashmir Files) चमूलाही निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणावरून विरोधकांच्या भुवया उंचावल्या असून, त्यांचा या कार्यक्रमात सहभाग असण्याचे प्रयोजन काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या