यशवंत पंचायत राज अभियानाचे पुरस्कार जाहीर

नाशिक विभागात राहता, कळवण पंचायत समिती अव्वल
यशवंत पंचायत राज अभियानाचे पुरस्कार जाहीर

मुंबई | प्रतिनिधी

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत नाशिक विभागातून राहता प्रथम तर नाशिक आणि कळवण पंचायत समितीने अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषद द्वितीय तर सिंधुदूर्ग जिल्हा परिषद तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी केली. पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषदांना अनुक्रमे ३० लाख रुपये, २० लाख रुपये आणि १७ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) पंचायत समितीने, कागल (जि. कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय तर भंडारा (जि. भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यशवंत पंचायत राज अभियान सन २०२०-२१ अंतर्गत हे पुरस्कार आहेत. दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी म्हणजे १२ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पण करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा या दिवशी हा कार्यक्रम होणार नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहीत करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे आणि त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन , विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना विभागस्तर तसेच राज्यस्तरावर "यशवंत पंचायत राज अभियान" पुरस्कार देण्यात येतात, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामपंचायतींसाठी स्मार्ट ग्राम व्हिलेज योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात येतात. यशवंत पंचायत राज पुरस्कार निवड करण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल करून क्षेत्रिय पडताळणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विभागस्तरीय पुरस्कार

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या अत्युत्कृष्ट ठरलेल्या पंचायत समित्या पुढीलप्रमाणे :

कोकण - कुडाळ (जि. सिंधुदूर्ग), मालवण (जि. सिंधुदूर्ग), सुधागड-पाली (जि. रायगड),

नाशिक- राहाता (जि. अहमदनगर), नाशिक (जि. नाशिक), कळवण (जि. नाशिक),

पुणे - कागल (जि. कोल्हापूर), गडहिंग्लज (जि. कोल्हापूर), माढा/कुर्डूवाडी (जि. सोलापूर),

औरंगाबाद- लातूर (जि. लातूर), नांदेड (जि. नांदेड), शिरुर अनंतपाळ (जि. लातूर),

अमरावती- अचलपूर (जि. अमरावती), दर्यापूर (जि. अमरावती), राळेगाव (जि. यवतमाळ)

नागपूर- भंडारा (जि. भंडारा), पोभुर्णा (जि. चंद्रपूर), कामठी (जि. नागपूर)

या पंचायत समित्यांना प्रत्येक विभागात अनुक्रमे ११ लाख रुपये, ८ लाख रुपये आणि ६ लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com