
दिल्ली | Delhi
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपी सुशील कुमारला बेड्या ठोकल्या आहे. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते. अखेर त्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले.
सुशील कुमार याच्यासोबत त्याचा साथीदार अजय सहावरत यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या १५ तुकड्या दिल्ली, पंजाबसह उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या भागात सुशील कुमारचा शोध घेत होत्या. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं आज, सुशील कुमार आणि त्याच्या साथीदाराला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर ४ मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुशील कुमारने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली पोलिस त्याचा आणि साथीदारांचा ५ मे पासून शोध घेत होते. सुशील कुमारने याप्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आले होते. विशेष म्हणजे हा व्हिडिओ खरा असल्याची पावती फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिली होती.