Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजागतिक परिचारिका दिन विशेष : देशात चोवीस लाख परिचारिकांची गरज

जागतिक परिचारिका दिन विशेष : देशात चोवीस लाख परिचारिकांची गरज

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

एक हजार रुग्णांमागे एक प्रशिक्षित परिचारिका आवश्यक असताना ते प्रमाण देशात अवघे 1.7 आहे. देशात 24 लाख परिचारिकांची गरज आहे. मात्र फारसा पगार व सेवासुविधा मिळत नसल्याने सात लाख भारतीय परिचारिका परदेशात जाऊन सेवा करत आहेत.

- Advertisement -

आज (दि.12) जागतिक परिचारिकादिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने परिचारिकांचा आढावा घेतला असता वरील बाब प्रकर्षाने समोर आली. नर्सिंगमध्ये शिफ्ट जॉब असतो. सकाळची शिफ्ट सकाळी 7 ते 4, सायंकाळची दुपारी 2 ते रात्री 10 आणि रात्रीची 9 ते सकाळी 8 असते. शिफ्टच्या एक तास आधी हॉस्पिटलमध्ये पोहोचावे लागते. प्रत्येक रुग्णाचा आजार, औषध, स्थिती जाणून, समजून घ्यावी लागते. प्रत्येक परिचारिकेवर 8 ते 10 रुग्णांची जबाबदारी असते. न्याहारी, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण वेळेवर करायला कधीच वेळ मिळत नाही.

गंभीर रुग्ण असेल तर स्वत:चे सर्व प्रश्न सोडून द्यावेे लागतात. त्यामुळे परिचारिकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि पाय सुजणे हे सामान्य आहे. पगारही 15 हजार रुपये सुरुवातीला मिळतो. पाच-सहा वर्षांच्या अनुभवानंतर तो 30 हजारांपर्यंत जातो. दुसरीकडे, रात्रीच्या ड्युटीवर रुग्णालयात जाणे किंवा संध्याकाळची ड्युटी केल्यानंतर रात्री घरी परतणे धोकादायक असते. असे हे सामान्य परिचारिकांचे जीवन आहे. त्यामुळे फिलिपिन्सनंतर भारतातील सर्वाधिक परिचारिका परदेशात जात आहेत.

भारतीय प्रशिक्षित नर्र्सेसची मागणी यूके, माल्टा, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड आणि सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक आहे. भरघोस पगार आणि स्वच्छ जीवनशैली हे त्याचे कारण आहे. भारतातील नर्सिंग स्कूलमध्ये दरवर्षी दोन लाखांहून अधिक नर्सिंग कोर्सच्या जागा निघतात. बहुतांश परिचारिका प्रशिक्षणानंतर परदेशात जातात. सर्वाधिक परिचारिका केरळच्या दर एक हजार लोकसंख्येमागे चार परिचारिका असायला हव्यात, पण भारतात 1.7 परिचारिका आहेत.

मानवाच्या अखेरच्या श्वासाची खर्‍या अर्थाने साक्षीदार असलेल्या परिचारिका आज समाजाच्या अविभाज्य घटक झाल्या आहेत. त्यांंची एकही चूक माफ होत नाही. कारण त्या यंत्रावक नव्हे तर जिवंत माणसांवर काम करतात. म्हणूनच त्यांंचेही सामाजिक, शारीरिक, मानसिक आरोग्य चांंगले राखणे हे गरजेचे आहे. शिक्षित परिचारिका व घर तेथे शिक्षित परिचारिका हेच ध्येय आम्ही ठेवले आहे.

डॉ. शोभा कर्डक, प्राचार्या, स्वामी नारायण नर्सिंग संस्था, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या