जागतिक प्रथमोपचारदिन विशेष : हृदयविकारानंतर रुग्णाला सीपीआर प्रथमोपचार महत्वाचा

जागतिक प्रथमोपचारदिन विशेष :  हृदयविकारानंतर रुग्णाला सीपीआर प्रथमोपचार महत्वाचा

नाशिक । शुभम धांडे Nashik

सध्याच्या वाढता ताणतणाव, जीवनशैलीमधील बदल यामुळे तरुणांपासून वृद्धांमध्ये मधुमेह Diabetes, रक्तदाब Blood pressure आणि हृदयविकार Heart diseaseअशा समस्यांचा धोका वाढला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर तत्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. कारण झटक्यानंतर हॉस्पिटलला पोहोचण्यापर्यंतचा प्रत्येक मिनिट त्या व्यक्तीसाठी गरजेचा असतो. अशा प्रसंगी काही मिनिटांच्या कालावधीत मिळालेल्या योग्य प्रथमोपचारामुळे First Aid रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येऊ शकतो.

या सगळ्यांचा विचार करता ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ प्रत्येक सुजाण नागरिकाने घेणे आवश्यक आहे. त्याचीच एक मुख्य क्रिया म्हणजे तीव्र झटक्यानंतर श्वासोश्वास चालू नसणार्‍या रुग्णाला सीपीआर (cardio-pulmonary-resuscitation) मदतीचे ठरते. यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन नियमित होऊन पुढील मदत मिळेपर्यंत ती व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर दरवर्षी, सप्टेंबरच्या दुसर्‍या शनिवारी जागतिक प्रथमोपचारदिन साजरा केला जातो. या वर्षी, 11 सप्टेंबर हा जागतिक प्रथमोपचारदिन आहे. जागतिक प्रथमोपचारदिन ही एक वार्षिक मोहीम आहे. प्रथमोपचार आणि त्यातून जखमींना कसे रोखता येईल आणि गंभीर परिस्थितीत जीव कसा वाचू शकेल, याबद्दल जनजागृती करण्यात येते.

जागतिक प्रथमोपचारदिन 2021

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीच्या मते, जागतिक प्रथमोपचार 2021 ची थीम ‘प्रथमोपचार आणि रस्ता सुरक्षा’ आहे. गेल्या वर्षी, थीम होती ‘प्रथमोपचार जीव वाचवते.’ तुम्ही प्रथमोपचार तीन ते सहा तासांत शिकू शकता आणि जीव वाचवण्याची ही फार मोठी गुंतवणूक नाही आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची पर्वा न करता कोणीही त्यासाठी प्रशिक्षण देऊ शकते.

प्रथमोपचारांची प्राथमिक माहिती असणे गरजेचे

ज्या व्यक्तीवर प्रथमोपचार करावयाचे आहे तिचे अस्वास्थ्य वाढू न देणे, वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तिला धीर देणे आणि उपचार चालू करणे, प्रकृतीत गुंतागुंत होऊ न देणे ही प्रथमोपचाराची उद्दिष्टे असतात. प्रथमोपचार करीत असताना श्वसनमार्ग मोकळा ठेवणे, कृत्रिम श्वासोच्छास देणे, गरज पडल्यास हृदय स्पंदन करणे, रक्तस्राव थांबविणे आदी बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोक दवाखान्यात पोहोचण्याआधीच मृत्युमुखी पडतात. अशा वेळी जीवन संजीवनी ही छाती दाबण्याची सोपी क्रिया प्रत्येकाला आली पाहिजे. यासाठी आम्हीसुद्धा सतत दोन ते तीन तासांचे हेंड वर्क शॉप घेत असतो. त्यामुळे पूर्वीच्या काळी जर सतीसावित्रिने आपल्या पतीसाठी ही क्रिया केली असेल तर आताच्या प्रत्येक व्यक्तीने ही क्रिया आत्मसात केली पाहिजे. जिच्याने एक जीवन रक्षक बनून अशा अनेक व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी हातभार लागू शकतो. या विशेष दिनानिमित्त सगळ्यांना ही क्रिया शिकण्याचे आवाहन करेल.

डॉ. हितेंद्र महाजन, भूलतज्ज्ञ सल्लागार

सीपीआर करताना लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत- सी-ए-बी

C - Circulation / Compressions - छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देऊन हृदयाचे कार्य चालू ठेवण्यास मदत करणे.

1.रुग्णाला जमिनीवर किंवा योग्य अशा सपाट भागावर पाठीवर झोपवावे.

2. रुग्णाला शेजारी गुडघ्यावर बसावे.

3. रुग्णाला छातीच्या मधोमध एक तळवा पालथा ठेवावा. त्यावर दुसरा तळवा ठेवावा. (लहान मुलांमध्ये एकाच हाताचा वापर करणं योग्य) 4. हात (सीपीआर करणार्‍या व्यक्तीचे) कोपरात न वाकवता सरळ ठेवावेत.

5. एका लयीत 1,2,3,4,5......30 पर्यंत मोजत, पंप दाबल्याप्रमाणे छातीवर दाब द्यावा. एका मिनिटात साधारण 100 कॉम्प्रेशन्स होतील अशा वेगात करावे.

A- Airway- श्वासाचा मार्ग मोकळा आहे ना, ह्याची तपासणी करणे.

1. रुग्णाची हनुवटी उचलून आणि कपाळ थोडेसे मागे दाबून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा करण्यास मदत करावी. 2. रुग्णाच्या छातीच्या हालचालीकडे लक्ष देऊन श्वास चालू आहे का ते पहावे.

B-Breathing - कृत्रिम श्वास देणे

1. रुग्णाचा श्वास चालू नाही अशी शंका आल्यास मुलाच्या तोंडावर आपले तोंड ठेवावे. 2. रुग्णाचे नाक चिमटीने बंद करावे. 3. एका सेकंदाला एक अशा पद्धतीने दोन श्वास आत सोडावेत. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत 30 चेस्ट कम्प्रेशन्स - 2 श्वास - पुन्हा 30 कम्प्रेशन्स - 2 श्वास हे चक्र चालू ठेवावे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com