जगप्रसिध्द शिहान द्राक्ष वाण भारतात दाखल
मुख्य बातम्या

जगप्रसिध्द शिहान द्राक्ष वाण भारतात दाखल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

जगातील पेटंटेड द्राक्ष वाण देशात पहिल्यांदा आणण्यात नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला यश आले आहे. कॅलिफोर्नियातून आयात केलेल्या ‘आरा’ या वाणाची यशस्वी लागवड केल्यानंतर ‘सह्याद्री’ने इटलीतील जगप्रसिध्द शिहान वाण आयात केले आहेत. शिहान श्रेणीतील टिमको, अलीसन, टिमसन, आयव्होरी, मेलडी हे वाण नुकतेच दाखल झाले आहेत.

इंग्लंड येथील ‘स्पेशल न्यू फ्रुट लायसनिंग’ (एसएनएफएल) या पेटंट द्राक्ष वाणांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या द्राक्ष नर्सरीचे टिमको, अलीसन, टिमसन,आयव्होरी, मेलडी हे वाण भारतात दाखल झाले आहेत. रसाळ गोड चव, कुरकुरीतपणा, मण्याचा मोठा आकार, रोग प्रतिकारक्षम, प्रतिकूल परिस्थितीतही चांगली फलधारणक्षमता आणि जगभरातील ग्राहकांकडून असलेली मागणी ही या वाणांची गुणवैशिष्ट्ये आहेत.

चिली, दक्षिण अफ्रिका, इजिप्त, पेरु या द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांत शिहान वाणांमुळे तेथील द्राक्षशेतीत मोठे बदल घडून आले आहेत. पारंपारिक पिकांच्या तुलनेत या वाणांतून चांगली उत्पादकता व गुणवत्ता मिळत असल्याने जगभरातील द्राक्ष उत्पादकांनीही या वाणांना पसंती दिली आहे.

भारतात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. राज्यातील द्राक्षशेती मागील अनेक वर्षांपासून अनेक आव्हानांतून वाटचाल करीत आहे. राज्यातील प्रचलित द्राक्षवाणांची उत्पादकता कमी झाल्याने द्राक्ष उत्पादकांसमोरील अडचणीत वाढच होत आहे. या स्थितीत जगातील इतर द्राक्ष उत्पादक देशांशी होत असलेल्या स्पर्धेत टिकून राहणे हे मोठे आव्हान भारतापुढे आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात दाखल झालेले हे द्राक्षवाण द्राक्ष उत्पादकाचा खर्च काही प्रमाणात कमी करतील आणि जागतिक गुणवत्तेच्या स्पर्धेतही सरस राहतील. असे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी सांगितले.स्पेशल न्यू फ्रुट लायसनिंग (एसएनएफएल) ही द्राक्ष वाणांच्या संशोधनात आघाडीवर असलेली जागतिक दर्जाची कंपनी आहे. चिली, दक्षिण अफ्रिका, पेरु, इजिप्त यासह सर्व द्राक्ष उत्पादक देशांत ‘एसएनएफएल‘ने संशोधित केलेले द्राक्ष वाण लोकप्रिय आहेत.

सह्याद्री फार्म्सने या आधी द्राक्षाचे आरा श्रेणीतील वाण कॅलिफोर्नियातून आयात केले आहेत. सह्याद्रीच्या रावळगाव (ता.मालेगाव) येथील प्रक्षेत्रावर या नव्या वाणांच्या चाचण्या सुरु आहेत. चाचण्यांची प्रक्रिया शास्त्रशुध्द पध्दतीने पूर्ण झाल्यानंतर हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. ‘सह्याद्री’ ने आतापर्यंत एकूण 17 वेगवेगळे वाण भारतात आयात केले आहेत. यामुळे राज्यातील द्राक्षशेतीचे चित्र बदलणार आहे.

जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर भारतीय शेतकऱ्यांकडे जागतिक दर्जाचे वाण उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठीचे निकष व खर्च पाहता आपल्याकडील एकट्या दुकट्या अल्पभुधारक शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरील ही बाब आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत हे शक्य होऊ शकते. ‘सह्याद्री फार्म्स’ने जगभरातील नामांकीत ब्रीडर्सची करार करुन आपल्या शेतकऱ्यांसाठी हे वाण आयात केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास व जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम गुणवत्ता मिळण्यास मदत होणार आहे.
विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोहाडी
Deshdoot
www.deshdoot.com