जागतिक पर्यावरण दिन विशेष : ‘केवळ एक पृथ्वी’ या वर्षाची संकल्पना

निसर्गाचे देणे द्यायलाच हवे!
जागतिक पर्यावरण दिन विशेष :  ‘केवळ एक पृथ्वी’ या वर्षाची संकल्पना

आज जागतिक पर्यावरण दिवस! ( World Environment Day )या वर्षाची संकल्पना आहे ‘केवळ एक पृथ्वी’ ('Only One Earth') याच पृथ्वीवरील पर्यावरण (The environment) धोक्यात आले आहे. मानवाचा वाढता हस्तक्षेप अंतिमत: निसर्ग आणि मानवाच्या अस्तित्वावरच घाला घालत आहे अशीच सध्याची परिस्थिती आहे. आपल्या वसुंधरेचे संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध होऊ या!

निशिकांत मुरलीधर पगारे, अध्यक्ष-गोदावरी गटारीकरण विरोधी मंच नाशिक.

जो पर्यंत लोकांना स्वतःहून पर्यावरणाविषयी आपुलकी वाटत नाही, तोपर्यंत पूर्णत: प्लास्टिक बंदी होणार नाही. नाशिकमधील गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून गेली 12 वर्षे झाले तरी कार्य सुरू आहे. ‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंच’ या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. गोदावरी प्रदूषणासाठी केवळ प्रशासन जबाबदार नाही, तर एक नाशिककर म्हणून गोदावरी स्वच्छ ठेवणे, ही आपलीही जबाबदारी आहे. गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात 176/2012 जनहित याचिका दाखल केली आहे. प्लास्टिक पिशव्या हा नदी प्रदूषण करणारा मोठा घटक आहे.

नाशिकमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती केली जाते. लहान मुलांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व लवकर समजते, पण मोठ्या माणसांची प्लास्टिक वापरण्याची सवय मोडणे सहज शक्य होत नाही. लहान मुलांचा मेंदू कोरा असतो. त्यामुळे आपण त्यांना जे सांगू ते लहान मुले खरे मानतात. चांगले काय हे बहुतेकदा त्यांना जास्त कळते. शाळांमधील या लहान मुलांमार्फतच आम्ही त्यांच्या पालकांपर्यंत प्लास्टिक बंदीचा हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.

गोदावरीत सोडले जाणारे निर्माल्य हे गोदावरी प्रदूषित होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. काही लोक निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ते नदीत सोडतात. यामुळे घनकचरा तयार होतो. घनकचर्‍यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. घनकचरा हा पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच घातक आहे. लोकांना निर्माल्य हे निर्माल्यकलशातच टाकण्याचे आवाहन केले जाते. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरण्याऐवजी लोकांनी शाडूच्या गणपतीची मूर्ती स्थापना करावी. गोदावरीच्या तटावर ठिकठिकाणी स्टॉल उभारून गणेश मूर्ती विसर्जनासाठी येणार्‍या भाविकांना त्यांच्याकडील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान करण्याचे आवाहन केले जाते. नंतर त्या मूर्तींचे कृत्रिम जलाशयात विसर्जन केले जाते.

सिमेंट क्रॉकिट, पेवर ब्लॉक व डांबरीकरणाच्या माध्यमातून झाडाच्या बुंध्याचा गळा आवळला जातो. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे झाडांना श्वास घेता येत नाही. त्यांची वाढही खुंटते. झाडांच्या मुळांचा विस्तारही थांबतो. कालांतराने अशी झाडे कोलमडून पडतात. झाडांभोवती दोन फुटांचे आळे तयार करण्यात यावे यासाठी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार झाडांना दोन फूट आळे करावे असे आदेश जिल्हा न्यायालयाने दिलेले आहेत..

गोदावरीचे प्रदूषण, गोदावरीत सोडले जाणारे सांडपाणी, त्यामुळे नदीपात्रात निर्माण होणारा फेस, वाढत्या पाणवेली हे दुर्दैव आहे.

गोदामाता नव्याने जगली पाहिजे, ती प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, हे नाशिककर म्हणून प्रत्येकाचे परमकर्तव्य आहे. प्रत्येकाला पर्यावरणाविषयी प्रेम असायलाच हवे. कारण, जर आज जलप्रदूषणाची अशी भयंकर परिस्थिती आहे, तर पुढे भविष्यात ही समस्या अजून गंभीर होऊ शकते. आपल्याला आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करायला हवे. किमान आपल्या भावी पिढीला भविष्यात नैसर्गिक साधनसंपत्ती काय असते हे दाखवण्यासाठी तरी पर्यावरणाचे संरक्षण करायला घ्यायला हवे.

भारताला जगातील इतर देशांच्या मानाने अधिक नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना लाभला आहे. तो आपण जपून वापरायला हवा. निसर्ग आपल्याला खूप काही सतत देतच असतो. त्याचे देणे थांबत नाही. परंतु, आपणही कुठेतरी आता निसर्गाला त्या मोबदल्यात काहीतरी द्यायला हवे. पर्यावरणाचे रक्षण करता येत नाही, तर निदान प्रदूषणाने त्याची विल्हेवाट तरी लावू नका

निशिकांत मुरलीधर पगारे, अध्यक्ष-गोदावरी गटारीकरण विरोधी मंच नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com