Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात

मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या ( Upcoming NMC Elections ) दृष्टीने 23 जून रोजी निवडणूक आयोगाच्या ( State Election Commission ) सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या शहरातील 44 प्रभागांच्या प्रारूप मतदार यादीवर ( Voters List ) 3 जुलैपर्यंत हरकती स्वीकारल्या. हरकती तब्बल 3847 आल्यामुळे महापालिका प्रशासन हरकतीचा निपटारा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अंतिम यादी प्रसिद्ध झाली तरी मतदान कधी होणार याबाबत अद्याप आयोगाकडून स्पष्ट निर्देश आलेले नाही. तरी महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. आयोगाने नुकताच एक पत्र पाठवून महापालिका आयुक्तांना अधिकार देत चार किंवा पाच प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी हा उपजिल्हाधिकारी दर्जाचा तसेच आचारसंहिता कक्ष तयार करून त्यासाठी देखील कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍याची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महापालिका आयुक्त रमेश पवार या कामाला लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रारुप मतदार यांद्यांचे काम सुरु झाल्यानंतर महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी प्रभागात जाऊन माहिती घेत होते. महापालिका निवडणुकीसाठी 44 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. 43 प्रभागात तीन तर एका प्रभागात चार सदस्य असणार आहेत. पालिका निवडणुकीची रणधुमाळी एप्रिलमध्येच उडेल अशी चर्चा होती. परंतु करोना आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळे आले.

परिणामी निवडणूका पुढे ढकलाव्या लागल्या.दरम्यान, अंतिम मतदार यादीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील एकूण 133 वॉर्डचे आरक्षण देखील जाहीर केले आहे. यामध्ये महिला आरक्षणासह 29 वार्ड जातनिहाय आरक्षित करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप आदेश आले नसल्यामुळे शहरातील 104 वार्ड खुले राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या