Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकरोना नियंत्रणासाठी 'या' चतु:सुत्रीवर काम करा- जिल्हाधिकारी मांढरे

करोना नियंत्रणासाठी ‘या’ चतु:सुत्रीवर काम करा- जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी

टेस्ट; ट्रॅक; ट्रीट अँड व्हॅक्सिनेट ही कोरोना व्यवस्थापनाची प्रमुख चार अंगे आहेत. यावरच आधारित केंद्र शासन व राज्यशासनाने आपली करोना नियंत्रणाची पुढची दिशा निश्चित केली आहे.

- Advertisement -

त्यानुसार कामकाज प्रभावीरीत्या केल्यास तातडीने संसर्गावर नियंत्रण येऊ शकते, त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत उपाययोजना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी कराव्यात. त्याचा तालुकानिहाय आढावा चालू आठवड्यापासून प्रत्यक्ष घेण्यात येईल, तसेच या उपाययोजनांचे पालन न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल याची जाणीव प्रत्येकास करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील तालुकास्तरावरील ग्रामीण व शहरी भागातील करोना नियंत्रणाबाबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही दिवसापासून करोनाचे संकट अधिक गंभीर होत आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अत्यंत योग्य नियोजन करून कार्यवाही करणे आवश्यक झालेले आहे. त्यात प्रामुख्याने कंटेनमेंट झोन मधील प्रभावी व्यवस्थापन हा संसर्ग रोखण्याचा सर्वात महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे व त्याला प्रतिसाद न मिळाल्यास अधिसूचनेनुसार कठोर कारवाई केली जाईल.

जारी केलेल्या आदेश याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर करावी. करोना मुळे होणार्‍या मृत्यूंबाबत विशेष दक्षता घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) येथे मृत्यू होणार नाही याबाबत ‘सीसीसी’ मधील रुग्णाची नियमित तपासणी होत असल्याची खात्री करावी. एखाद्या रुग्णाची स्थिती खालावल्यास त्याला वेळीच ‘डीसीएचसी’ व ‘डीसीएच’ मध्ये स्थलांतरीत करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी रुग्ण हाताळणीचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. त्यामध्ये शिफ्टनिहाय कर्मचार्‍यांची नावे, अम्ब्युलन्स क्रमांक, वाहनचालकाचे नाव, ‘सीसीसी’ ते ‘डीसीएचसी’ किंवा ‘डीसीएच’ असा प्रवासाचा मार्ग इत्यादी बाबींचा समावेश असावा.

सीसीसी, डीसीएचसी यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत असल्याचे पहावे. तालुक्यातील सीसीसी, डीसीएचसी या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स नियुक्त आहेत का याची खात्री करणे. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा- जेवण, पाणी, औषधे इत्यादी पुरविल्या जातील याबाबत दक्षता घ्यावी, असे. मांढरे यांनी सांगितले.

सर्व्हे करण्यासाठी पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याची आवश्यकता नाही. एखाद्या भागात पॉझिटीव्ह रुग्ण नसला तरीही सर्व्हे करता येईल. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, हायपर टेन्शन, हृदय रोग, किडनी विकार, श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांचा शोध घेता येईल. सर्व्हे करणार्‍या पथकांवर पर्यवेक्षण करणे व त्यांच्याकडील माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण करणे व निष्कर्ष काढणे, यासाठी स्वतंत्र माहितगार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत. स्वॅब चाचणी अहवाल 24 तासांचे आत येणे आवश्यक आहे.

जर 24 तासाचे आत अहवाल येत नसतील तर डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांचेशी संपर्क करावा. कंटेनमेंट झोन हे फार मोठे असू नयेत. पॉझिटीव्ह रुग्णाचा वावर विचारात घेऊन कंटेनमेंट झोन निश्चित करावा. कंटेनमेंट झोनमध्ये औषधी, किराणा, भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कसा केला जाईल याचे नियोजन करावे. चालू आठवड्यापासून तालुकानिहाय प्रत्यक्ष भेटी देवून आढावा घेतांना केंद्र व राज्य सासनाच्या शासनाच्या मार्गदर्शक मुद्यांच्या अनुषंगाने तसेच आज देण्यात आलेल्या सूचनांच्या पूर्ततेवर आढावा घेतला जाईल. त्यामुळे त्या पूर्ततेबाबत सतत प्रयत्नशील रहावे व त्याबाबत माहिती सतत जवळ ठेवावी. असेही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या