जागतिक चहा दिवस विशेष : चहा एके चहा.. पिऊन तरी पहा...

जागतिक चहा दिवस विशेष :  चहा एके चहा.. पिऊन तरी पहा...

नाशिक | दिनेश सोनवणे

नाशिककर आता मिसळसोबतच आता चहाच्याही प्रेमात पडलेले दिसून येतात. चहा पिण्यासाठी ते काही किलोमीटर प्रवास देखील करू शकतात. चहाप्रेम इतके की, घरात कुणी पाहुणा आला तर चहा घेणार का? असे विचारल्याशिवाय आदरातिथ्य केल्यासारखेच वाटत नाही... (World tea day special)

कुल्लडमध्ये चहा पिण्याचा वेगळा ट्रेंड (New trend सध्या अनेक घरातदेखील दिसून येत आहे. तर अनेक जण ब्लॅक टी (Black tea), ग्रीन टी (Geen Tea) सारखे वेगवेगळया चवीचाही रोजच्या चहामध्ये समावेश करताना दिसतात.

अनेकांची सकाळची सुरवातच चहाने होते. नाशिकच्या प्रत्येक कोपर्‍यावर, प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला चहाची टपरी हमखास दिसेल. टपरीवरच्या कटिंगची (Cutting tea) मजा काही औरच आहे. ठिकठिकाणच्या या चहाच्या टपर्‍या म्हणजे अनेकांना आपलं घरचं वाटू लागते. मामा, मामी, काका, काकू अशी नावे देऊन आपण टपरीवाल्या व्यक्तींनाही आपल्या कुटुंबातच सामावून घेतले आहे.

वाईन कॅपिटल (Wine Capital), मिसळ कॅपिटल (Missal Capital) अशा अनेक पदव्या संपादन करणारे नाशिक शहर (Nashik City) आता अमृततुल्यांनी गजबजलेले दिसते. यात पाच रुपयांचा चहा कधी दहा आणि वीसाचा झाला हे समजलेच नाही. चहाप्रेमींचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शहरात चहाप्रेमी गल्लोगल्ली सापडतील. कधी हळदीचा चहा तर कधी तंदुरी चहा, दुपार झाली की, चहा घेण्याची तलफ काही वेगळीच असते.

काहीजण प्रफुल्लित होण्यासाठी चहा पितात, तर काहींना विश्रांती घेण्यासाठी चहा लागतो. काहींना स्वत:ला शांत करण्यासाठी, तर काही स्वत:ची झोप उडविण्यासाठी चहा अगदी सुरर्र करून पितात. चहा पिणारे नाशिककर जसे वेगवगेळ्या प्रकारचे आहेत तसेच या नाशकात चहाचेही विविध प्रकार सापडतात.

चहा आणि मैत्रीची गट्टी (friendship with tea)

चहा हे एकट्याने पिण्याचे पेयच नाही. चहा आणि मैत्री यांची गट्टी आहे. चहा आणि मैत्री यावरच्या अनेक चारोळ्या प्रसिद्ध आहेत. ‘ज्या चहात साखर नाही, तो चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही, अशा जीवनात मजा नाही’ अशा चारोळ्यांचे साहित्यिक मूल्य चर्चेचा विषय ठरुही शकेल पण तेच अनेकांच्या व्हॉटसअ‍ॅपचे स्टेटस (Whats app Status) असते. चहामुळे मैत्र जमले आणि आपण चहाबाज झालो अशाच सर्वांच्या भावना असतात. चला रे जरा चहा मारुन येऊ..

असे म्हणत जमलेले चार-पाच मित्र-मैत्रिणी आणि चहाची टपरी हे अनेकांचे हळवे कोपरे असतात. मैत्रीचे वय वाढत जाते..चहाच्या टपरीचे रुपडेही बदलते..चहाची चव आणि प्रकारही बदलतात. आता तर चहाच्या कपाची साईजही बदलली आहे. पण वाफाळता चहा आणि मित्र-मैत्रिणींचा गप्पाचा रंगलेला फड याची लज्जत मात्र कधीही बदलणार नाही.

तंदुरी चहा (Tandoori Tea)

या रेसिपीमध्ये चहा नेहमीच्या भारतीय पद्धतीने तयार केला जातो. मातीची लहानगी भांडी (कुल्लड) तंदूरमध्ये गरम केली जातात आणि तयार चहा मातीच्या गरम भांड्यात ओतला जातो. या प्रक्रियेने मातीच्या गरम भांड्याचा स्वाद चहामध्ये उतरतो आणि एक वेगळीच चव देतो.

अमृततुल्यांचा बोलबाला (Number of amruttulya increased)

पुण्याहून एका प्रतिष्ठित अमृततुल्यने नाशकात व्यवसाय सुरु केला. चहाप्रेमी नाशिककरांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. हे बघून अनेकांनी गल्लोगल्ली अमृततुल्य सुरु केले. चहाच्या टपरीला अमृततुल्य नाव दिले, विशिष्ट मसाला तयार करून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातून शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने हे व्यवसाय सुरु झाले.

गुळाच्या चहाची चर्चा (Gulacha Chaha)

नाशकात आता गुळाच्या चहाची जोरदार चर्चा आहे. मुंबई आग्रा महामार्गावर या चहाने चांगलेच मार्केट काबीज केले आहे. घराबाहेर पडल्यानंतर वेगळा चहा घेऊयात असे म्हणत अनेक जण गुळाच्या चहाला पसंती देताना दिसून येत आहेत.

हळदीचा चहा (Turmeric tea)

गंगापूर रोडवर हळदीचा स्पेशल चहा मिळतो. याठिकाणची चमचमीत मिसळ खाल्यानंतर हळदीचा चहा प्राशन करणे जणू शास्रच असते असे म्हणत अनेक नाशिककरांनी या चहाला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.

मसाला चहा (tea with masala)

तुम्ही कोणत्याही चहाच्या टपरीवर जा मसाला चहा तुम्हाला मिळेलच.सहज उपलब्ध होणार्‍या या चहाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इंडियन स्पाईस टी अथार्त ‘मसालेदार चहा’ याचा राजेरजवाडे आणि आयुर्वेदाच्या कथांमध्ये नेहमीच उल्लेख सापडतो. आताच्या मसाला चहामध्ये असंख्य बदल झाले आहेत आणि आता तो जगभरात प्रसिद्ध झाला आहे.

सलीमची टपरी (Salim mamu tea point)

सलीमच्या टपरीवर ये’ असे जर कुणी म्हटले तर देवळाली नाशकाच्या कानाकोपर्‍यातील व्यक्तीलाही ती चहाची टपरी कुठे आहे ते सांगावे लागत नाही. कॉलेज रोडवरील सलीमच्या टपरीवर पिढ्यानपिढ्या चहाचा व्यवसाय चालत आला आहे. विशेष म्हणजे, सलीमच्या टपरीवर जो कट्टा चहा घेण्यासाठी यायचा त्यांचे एक संमेलनदेखील नाशकात झाले होते. या दिवशी शेकडो नागरिकांनी या संमेलनाला भेट देत सलीमच्या टपरीवरील आठवणींना उजाळा दिला.

इराणी चहा (Irani Tea)

गेल्या शतकात मुंबईच्या बंदरात पर्शियन स्थलांतरितांनी प्रवेश केला आणि मुंबईहून ते पुण्यात, नंतर हैदराबादला आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यांच्याबरोबर इराणी चहाची संकल्पनाही भारतात आली. इराणी चहा आणि उर्वरीत चहा बनविण्याच्या शैलीत फरक आहे. बंद असलेल्या भांड्यात चहाची पाने पाण्याबरोबर उकळतात. दुध देखील वेगळ्या भांड्यात उकळवले जाते आणि दुधाची सायही वेगळी गोळा केली जाते. नंतर चहा देताना प्रथम दूध ओतले जाते नंतर काळा किंवा कोरा चहा त्यात टाकला जातो आणि त्यावर दुधाची साय टाकली जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com