जिल्ह्यात प्रथमच महिला शांतता समितीची स्थापना

जिल्ह्यात प्रथमच महिला शांतता समितीची स्थापना

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

ग्रामीण भागात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे लक्षात येताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पुन्हा अवैध धंद्यांवर धडक कार्यवाही सुरू केली आहे.यामुळे अवैध धंदेवाल्यांचे ढाबे दणाणले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील उमराळे दुरक्षेत्राच्या गोळशी बीट पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळकृष्ण पजई यांनी अवैध धंद्यांवर हातोडा मारण्यासाठी महिला शांतता व दारूबंदी कमिटी स्थापन केली आहे. यामुळे गावातील अवैध धंद्यांना आवर घालण्यास मदत होणार आहे. ही प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात राबवावी असे मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेताच प्रथमता अवैध धंद्यांवर टाच मारली. त्यात त्यांना यशही आले. परंतु ग्रामीण भागातून सध्या पुन्हा अवैध धंदे सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर पुन्हा एकदा उमाप यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम आखली आहे. संपूर्ण जिल्हाभरात धाडी टाकून त्यांनी लाखोच्या ऐवज जप्त करत अवैध धंद्यावाल्यांवर कारवाया केल्या आहेत. तसेच पोलिसांना देखील आपापल्या भागात अवैध धंदे चालणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील उमराळे दुरक्षेत्राच्या गोळशी बीटाचे पोलीस हवालदार बाळकृष्ण पजई यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. यात बीटातील सर्व गावांमध्ये महिला शांतता व दारूबंदी कमिटी स्थापन करून महिलांना एकत्र आणले आहे. यावेळी महिलांना योग्य ते मार्गदर्शन करत कायदेशीररित्या अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना कशाप्रकारे मदत करायचे? याचे मार्गदर्शन केले आहे. महिला वर्गाला पोलीस संरक्षण देत अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत संयुक्तरीत्या कारवाया सुरू करण्यात आल्या आहे. यासाठी बाळकृष्ण पजई यांचे मार्गदर्शन महिलांना मोलाचे ठरत आहे.

गावातील महिलांना एकत्र आणत गावातील प्रमुख स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत महिलांना अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात एकत्र केले. गावात जुगार खेळताना जरी कोणी आढळले तरी त्यांच्यावर विरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन हवालदार पजई यांनी दिले. यासाठी पोलिसांनी महिलांना पोलीस ठाण्याच्या वतीने ओळखपत्रही देण्यात आले आहेत. उमराळे दुरक्षेत्राच्या गोळशी बीटातील आंबेगण, धागुर , चाचडगाव, झार्लीपाडा, गोळशी, पिंप्रज, शृंगारपाडा, महाजे आदी गावातील महिलांना एकत्र करून महिला शांतता व दारूबंदी कमिटी स्थापन करण्यात आली आहे.

आता महिला एकत्र येऊन गावात जर काही अवैध व्यवसाय कोणी करण्याचे धाडस करत असेल तर त्यांच्या विरोधात आक्रमक होतात. याविषयी पोलिसांना तात्काळ माहिती देत अवैध धंदेवाल्यांना रंगेहाथ पकडून देण्याचे काम महिला करीत आहेत. त्यामुळे या परिसरात अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी महत्त्वाची मदत होत आहे. या कमिटी मध्ये हिराबाई पागे, लंका गायकवाड, यमुना पागे जनाबाई गायकवाड, मंदाबाई गायकवाड, सखुबाई गायकवाड, कमल चारोस्कर, सुगंधा पागे, यशोदा कोतवाल, विठाबाई वाघ, मंगला इंगळे, शांताबाई झनकर , रेखा इंगळे, योगिता चौधरी, सुरेखा झनकर, रोहिणी चौधरी, अश्विनी इंगळे आदी महिला काम करत आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये अशी समिती स्थापन होऊन अवैध धंद्यावाल्यांवर धडक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असुन अवघ्या जिल्ह्यात पोलीस हवालदार बाळकृष्ण पजई यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे अनुकरण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अवैध धंद्यावाल्यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेबांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नक्कीच त्याचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.‌दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या बीटामध्ये महिला शांतता व दारूबंदी कमिटी स्थापन केली असून महिलांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकार प्राप्त झाल्याने महिला अवैध धंद्यावाल्यांच्या विरोधात आक्रमक होऊन पोलीस स्टेशनला आवश्यक ती माहिती पुरवत आहेत. त्याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन केले असून माहिती मिळताच महिलांना संरक्षण देत संबंधित अवैध धंदेवाल्यांच्या मुस्क्या आवळ्या जात आहेत. महिलांनी या मोहिमेत सहभाग घेत आवश्यक सहकार्य करत असल्याने मोहिमेला यश मिळत असल्याने समाधान लाभत आहे.

- बाळकृष्ण पजई, पोलीस हवालदार, गोळशी बीट

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com