पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

jalgaon-digital
2 Min Read

कळवण | प्रतिनिधी

धार्डेदिगर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या मोहबारी गावाला गेल्या तीन ते चार वर्षापासून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील शेतातील विहिरींवर वणवण फिरावे लागत आहे. महिलांच्या सहनशीलतेचा बांध तुटल्याने मोहबारी पासून दोन कि.मी. पायी चालत धार्डेदिगर येथील ग्रामपंचायत मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला.

मात्र मोहबारी येथील ग्रामपंचायत सदस्याने पाणी पुरवठा न करता आल्याने आपले अपयश झाकण्यासाठी अभोणा पोलिसांना पाचारण करून करोनाच्या सामाजिक अंतराचे उल्लंघन केल्याचे कारण दाखवत ग्रामस्थांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोर्चेकरी आदिवासी महिलांनी केला आहे.

धार्डेदिंगर परिसरात दरवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. मात्र पाणी अडविणे, जिरवणे तसेच पाणी पुरवठा योजनेची उद्भव विहीर पाण्याचा श्रोत असलेल्या योग्य ठिकाणी नसल्याने व पाण्याचे योग्य निययोजन नसल्याने उन्हाळ्यात सर्वच गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.

त्यात या परिसरात विजेचीही खेळखंडोबा असल्याने महिलांना एक हंडा पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी, म्हणून अनेक वेळा ग्रामपंचायत, पंचायत समितीकडे निवेदन देऊन व समक्ष अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन पाणी टंचाईबाबत समस्या मांडली आहे. मात्र प्रत्येक वेळा आश्वासन देऊन आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. सामाजिक अंतराचे पालन करीत महिलांनी आंदोलन केले.

मोहबारी येथे पाणी टंचाई आहे. येथे नवीन योजना प्रस्तावित केली आहे. त्यास मंजुरी मिळाली नाही. सद्या तात्पुरत्या स्वरूपात विंधन विहिरी घेऊन अथवा शेतकर्‍यांची विहीर अधिग्रहित करून गावाला पाणी पुरवठा केला जाईल.

आर. एस. जाधव – ग्रामसेवक

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दरवेळी ग्रामपंचायतीकडे समस्या मांडली असतांना विहीर करतो, जलवाहिनी करतो अशी आश्वासने दिली आहेत. मात्र पाणी आलेच नाही.

शकुंतला बर्डे- महिला मोहबारी

मोहबारी, पिंपळेखुर्द या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 50 हजार रुपये ग्रामपंचायत ़फंडातून खर्च केला गेला आहे. परंतु मोहबारी ग्रामस्थ वर्षानुवर्षे तहानलेले असतांना त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पैसा नाही. या बेकायदेशीर खर्चाची चौकशी करून संबंधितांकडून वसूल करावी.

राजेंद्र भोये – ग्रामस्थ मोहबारी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *