
येवला । प्रतिनिधी Nashik
पैठणी महावस्त्र महिलांसाठी देखणा दागिनाच... येथे अनेक पुरुष पारंपारिकरित्या या देखण्या साडीला गेल्या अनेक शतकांपासून हातमागावर आकार देत आहे. पण अनेक महिलांना इच्छा असूनही शिकण्याला मर्यादा पडतात. मात्र वस्त्र मंत्रालयाच्या उपक्रमामुळे येथील महिला मोफत विणकाम प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होऊ शकणार आहे.
केंद्रिय वस्त्र मंत्रालय अंतर्गत बुनकर सेवा केंद्र मुंबई यांच्या वतीने येथे विणकाम प्रशिक्षण देण्यात येत असून 20 महिलांच्या या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. विठ्ठल नगर येथे या प्रशिक्षणाच्या उद्घाटन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष विंचू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुनकर सेवा संघ मुंबईचे उपसंचालक संदीप कुमार, मेहुल लुनेचिया व भाजपाचे विणकर सेलचे उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष मनोज दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सहभागी युवक व महिलांना प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सुमारे पंचेचाळीस दिवसांचा कालावधी या प्रशिक्षणासाठी असणार असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. नवतरुण युवक व महिलांना येथील विणकामाची व हातमागाची परिपूर्ण माहिती असलेले प्रशिक्षक शिकविणार असून या कालावधीत पैठणी विणण्याचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करून घेण्याची संधी महिलांना मिळाली आहे.
येथील पत्रकाराच्या पुढाकाराने वर्तमानपत्राच्या माध्यमातून येवला पैठणीचा खर्या अर्थाने प्रचार व प्रसार झाला असल्याचे यावेळी बोलतांना दिवटे म्हणाले. या प्रशिक्षार्थींन प्रमाणपत्र देऊन बँकेच्या माध्यमातून व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असेही यावेळी दिवटे यांनी सांगितले.
वस्त्र मंत्रालयाने मोठी संधी उपलब्ध करून दिली असून येथे शिक्षण घेऊन हातमाग कला अवगत करा.
आम्ही आपल्या सेवेत कायमच उपस्थित आहोत. येवला शहर परिसरात खा.भारती पवार यांच्या पाठपुराव्याने आतापर्यंत दोन हजार विणकर बांधवांना केंद्र सरकारचे विणकर ओळखपत्र वाटप केले असून येत्या पंधरा दिवसांत आणखी 700 विणकरांना ओळखपत्र वाटप केले जाईल. सरकार व प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे बुनकर सेवा केंद्राचे संदिप कुमार यांनी प्रशिक्षार्थींना सांगितले.