गुलाबी गावाला महिला सबलीकरणाची साथ

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन विशेष
गुलाबी गावाला महिला सबलीकरणाची साथ

नाशिक । अनिरुद्ध जोशी Nashik

आज आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन(International Rural Women's Day) . त्यानिमित्ताने गुलाबी गाव (Pink village) येथील महिलांच्या कार्याचा आढावा. जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात ( Surgana Taluka )भिंतघर( Bhintghar ) हे आदिवासी गाव आहे. पूर्वी या गावाचे नाव वीरमाळ होते. सध्या हेच गाव ‘गुलाबी गाव’ म्हणून राज्यात सर्वत्र परिचित झाले आहे.

या गावात महिलांचे विविध सात बचतगट स्थापन झाले असून बचतगटाच्या माध्यमातून विविध उत्पादने बनवून महिलांनी स्वावलंबंनाचा मार्ग पत्करला आहे. पूर्वी घराचा उंबरठाही ओलांंडताना चार वेळा विचार करणार्‍या महिला आता शहरात येऊन विविध वस्तूंची, रानभाज्यांची विक्री करु लागल्या आहेत. महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे तसेच सक्षम करण्याचे काम या गावातील महिला एकमेकींना करत आहेत. महिला सबलीकरणाचे प्रतिक असलेल्या गुलाबी गावाने महिलांना बळ देऊन पुनश्च एकदा आदर्शात भर घातली आहे.

गुलाबी गावात सुरुवातीला महिलांचे गट नव्हते. महिला गावाच्या बाहेर देखील जात नव्हत्या. परंतु आता बचतगटामुळे महिला सक्षम झाल्याने त्या स्वतः आकाश कंदिलासह, तिळाचे लाडू, बर्फी यासारखे खाद्यपदार्थ, गो उत्पादन बनवतात. रानभाज्या पिकवून विकतात. त्यामुळे या महिलांना बर्‍यापैकी रोजगार उपलब्ध झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर रानभाज्या असून या रानभाज्यांचा महोत्सव दर शुक्रवारी नाशिक येथे भरतो. त्यात त्या सहभागी होतात. या रानभाज्यांमध्ये तेहर्‍याची भाजी,चाईचा मोहर, आळूच्या पानासह भाज्यांचा समावेश असतो. या भाज्या नागलीच्या भाकरीसोबत शहरी भागातील नागरिक आवडीने खातात.

या महिलांच्या पंखांना बळ देण्याचे काम रा.स्व. संघाच्या माध्यमातून केले जात आहे. प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांना दुलई बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या दुलया शहरात चांगल्या भाव मिळवून देत आहे. आता येथील 50 महिलांना शिवणकाम शिकवल्याने या महिला भविष्यात शालेय गणवेशही पुरविणार आहेत. एकीचे बळ,त्याला संघ शक्तीची साथ लाभल्याने गुलाबी गावाच्या लौकिकात भरच पडली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com