महिलांचा जलसमाधीचा प्रयत्न

रब्बी पिकांना पाणी दिले जात नसल्याने असंतोष
महिलांचा जलसमाधीचा प्रयत्न

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

रब्बी हंगामासाठी बोरी-अंबेदरी धरणातून (Bori-Ambedari Dam )पाणी सोडण्याचे आश्वासनाची पुर्तता पाटबंधारे विभागाचे अधिकारी करत नसल्याने रब्बी पिकांची वाताहत होत असल्याने हवालदिल झालेल्या संतप्त महिलांनी पिकांना पाणी मिळत नसेल तर आम्ही जगायचे कशाला असा सवाल पोलीस अधिकार्‍यांना करत जलसमाधीसाठी अंबेदरी धरणाकडे धाव घेतली. यामुळे एकच खळबळ उडाली. समयसुचकता दाखवत पोलिसांनी पाठलाग करत या महिलांची मनधरणी करत त्यांना अडविल्याने अनर्थ टळला.

बोरी-अंबेदरी धरणाचे पाणी जलवाहिनीऐवजी पाटकालव्याव्दारेच मिळावे या मागणीसाठी दहिदीसह परिसरातील महिला, शेतकरी गेल्या 48 दिवसापासून अंबेदरी धरणावर आंदोलन करत आहेत. जलवाहिनी योजनेचे काम अस्ताने, टोकडे शिवारातून प्रारंभ करण्यात आला असला तरी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे. रब्बी हंगामासाठी अंबेदरी धरणाचे पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाचे अभियंता संदीप पवार यांनी आंदोलक शेतकर्‍यांना दिले होते.

मात्र जलवाहिनीच्या (Water Pipeline )कामासाठी पुढाकार घेणारे अधिकारी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत असल्याने रब्बी पिके संकटात सापडल्याने शेतकर्‍यांसह महिला हवालदिल झाल्या आहेत. पाणी न मिळाल्यास संपुर्ण पिके वाया जाणार असल्याने पाणी सोडावे ही मागणी करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता ट्रॅक्टरसह इतर वाहनातून शेतकरी व महिला मालेगावी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यासाठी निघाले असता त्यांना पोलीस अधिकार्‍यांनी अडविले.

पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना आम्ही येथेच बोलवतो तुम्ही मालेगावी जावू नका, अशी विनंती पोलीस अधिकार्‍यांनी केल्याने महिला व शेतकरी यांनी मालेगावी जाणे स्थगित करत अधिकार्‍यांची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. मात्र दुपारचे दीड-दोन वाजून सुध्दा पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले नाहीत. त्यांचे भ्रमणध्वनीसुध्दा त्यांनी बंद केल्याने महिलांसह शेतकरी संतप्त झाले.

पाणी न मिळाल्यास रब्बी पिके पुर्णत: वाया जाणार आहेत. अधिकारी आश्वासन देतात मात्र पाणी देत नाही. शेतीच राहिली नाही तर आम्ही जगून काय फायदा? असा संतप्त सवाल करत महिलांनी जलसमाधी घेण्यासाठी धरणाकडे धाव घेतल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत पोलिसांनी जलसमाधीसाठी धावत असलेल्या महिलांचा पाठलाग करत त्यांना अडवून सदरचे कृत्य न करण्याबाबत मनधरणी केली. अप्रिय प्रकार घडू नये यास्तव सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धरणाजवळ देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रब्बी पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असतांना ते सोडले जात नाही. पाट कालव्याची स्वच्छता देखील पाटबंधारे विभागाने केलेली नाही. पालकमंत्र्यांच्या दबावातून कार्यकारी अभियंता संदीप पवार पाणी सोडण्यास टाळाटाळ करत आहेत. ठेकेदाराच्या हितासाठी यंत्रणा राबत असून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचे काम केले जात आहे. यामुळेच संतप्त महिलांनी पुन्हा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकार्‍यांनी प्रसंगावधान दाखवल्याने अप्रिय प्रकार टळला. या भागातील शेतकर्‍यांना उध्दवस्त करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप संघर्ष समितीचे निखील पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com