Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याऐकावं ते नवलंच! कोंबडी विना उबवणार अंडी

ऐकावं ते नवलंच! कोंबडी विना उबवणार अंडी

भऊर | बाबा पवार Bhaur, Deola

कोंबडी आधी की अंडे, हा प्रश्न आजही अनुत्तरित असला तरी अंडे उबवायला कोंबडीच हवी का? या प्रश्नाचे उत्तर मात्र देवळा तालुक्यातील भऊर येथील तरुणाने ‘नाही’ असे दिले आहे. ऐकायला नवल वाटत असलं तरी…

- Advertisement -

कोंबडीविना अंडे उबवणी शक्य करणारं यंत्र विकसित केलंय निलेश भाऊराव पवार यांनी. भऊर (ता. देवळा) येथील निलेश बारावी उत्तीर्ण असून शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला जिज्ञासू तरुण आहे.

या उपकरणाचा जन्मही अशाच जिज्ञासेतून झाल्याचे तो सांगतो. कोंबडी केवळ अंड्यांवर बसून विशिष्ट ऊब देऊन पिल्लांना जन्म देऊ शकते तर कृत्रिम ऊब देऊन देखील अंड्यापासून पिल्ल जन्माला येऊ शकतील का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी निलेशने प्रयोग करायला सुरुवात केली.

सुरवातीला पहिल्या, दुसऱ्या प्रयोगात तो अयशस्वी झाला मात्र त्याने जिद्द व चिकाटी कायम ठेवल्याने तिसऱ्या प्रयत्नात त्याने ‘विनाकोंबडी अंडी उबवणी’ यंत्र बनविले आहे.

थर्माकोलचा तीन बाय दोन फूट आकाराचा बॉक्स, साठ वॉटचे दोन बल्ब, दोन छोटे पंखे व तापमान कार्यप्रणाली ऑटोमॅटिक राहील यासाठी एक किट या गोष्टींचा माध्यमातून त्याने हे यंत्र विकसित केले आहे.

घरी दोन-तीन वेळेस हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याने या प्रयोगाला व्यवसाईक स्वरूप दिले असून अवघ्या दोन हजार दोनशे रुपयात त्याने या यंत्राची विक्री देखील सुरू केली आहे.

त्याच्या या अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा होऊ लागल्याने आता हे यंत्र पाहण्यासाठी व विकत घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. मात्र, याच काळात निलेशने आपल्या कल्पकतेच्या जीवावर नवीन व्यवसाय उभा केला आहे. अवघ्या दीड महिन्यात निलेशने जवळपास १६ यंत्र विकले असून यातून त्याची जवळपास ३५ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली आहे.

या यंत्राच्या माध्यमातून अन्यही पक्षांच्या अंड्यांपासून पिल्ल जन्माला येऊ शकतात. मात्र, त्यासाठी फक्त प्रत्येक पक्षांचा कालावधी माहिती असणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे एकवीस दिवसाच्या कालावधीत एक कोंबडी एका वेळेस केवळ वीस पिलांना जन्म देऊ शकते. मात्र, या यंत्राच्या माध्यमातून एकावेळी शंभर पिलांना जन्माला घालता येते.

या गोष्टीमुळे जे यंत्र विकत घेत आहेत आता ते देखील व्यवसाईक बनले असून या यंत्राच्या माध्यमातून अंड्यापासून पिल्ल तयार करून विक्री करण्याचा नवीन व्यवसाय तयार झाल्याने अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या