
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka ) देहेरेवाडी ( Dehrevadi ) येथील खुनाचा उलगडा लावण्यात दिंडोरी पोलिसांना यश आले असून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच नवर्याचा खुन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील देहरे वाडी ते राशेगाव रस्त्यालगत( Rasegaon Road ) झालेल्या पिंपळगाव बसवंत येथील इसमाच्या खुनाच्या गुन्ह्याची दिंडोरी पोलिसांनी उकल केली असून याप्रकरणी मयत अनिल झेंडफळे या इसमाच्या खून प्रकरणी मुख्य संशयित म्हणून मयताची पत्नी व तिचा प्रियकर यांना अटक करण्यात दिंडोरी पोलीसाना यश आले आहे.
याबाबतचे वृत्त असे की २ जून रोजी नाशिक ते पेठ रस्त्यालगत देहरे वाडी ते रासेगाव रोडवर पिंपळगाव बसवंत येथील अनिल राजाराम झेंडफळे या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दिंडोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेबाबत अधिक तपास केला असता मयत इसमाची पत्नी सुनिता अनिल झेंडफळे हिचे दीपक दत्तू गवे रा. रवळगाव ता. दिंडोरी ( ह. मु. पालखेड बंधारा ता. दिंडोरी) या इसमाशी सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते.
मयत अनिल झेंडफळे हा आपली पत्नी सुनिता हिस दारू पिऊन त्रास देतो व वेड्यासारखा वागतो म्हणून दिपक गवे व मयत अनिलची पत्नी सुनीता झेंडफळे यांनी संगनमत करून २ जूनच्या रात्री दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी, खैराडी शिवारात दारू पाजून घेऊन जात देहरेवाडी ते राशेगाव रस्त्याच्या लगत मयत अनिलच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी हातोडीने वार करून जीवे ठार मारले .
मयताचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रस्त्याच्या कडेला फेकून दिले. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी आरोपीच्या फोनच्या कॉल डिटेलच्या माहितीच्या आधारे खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत दोन्ही संशयितांना अटक केली आहे. याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षक माधुरी कांगणे , कळवण उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ , सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस नाईक धनंजय शिलावटे, बाळा पानसरे, संदीप कडाळे , युवराज खांडवी यांच्या पथकाने अधिक तपास करीत संशयित आरोपींना गजाआड केले आहे.