जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन

सलग दुसर्‍या दिवशी तापमानात घट; पारा 9.8 अंशांवर
जिल्ह्यात थंडीचे पुनरागमन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या पंधरवड्यापासून शहर व जिल्ह्यात थंडी (Cold )गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. मात्र, दोन-तीन दिवसांपासून पुन्हा थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. शनिवारी (दि.24) पहाटे अचानकपणे थंडीचा कडाका वाढला. नाशिकचे किमान तापमान 10.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. काल सलग दुसर्‍या दिवशी पहाटे तापमानात घट होऊन किमान तापमान 9.8 अंश सेल्सिअसपर्यंत घटले.

मागील शनिवारपासून (दि.10) तापमानात वाढ होऊन 30 अंश सेल्सिअस नोंदवले जात होते. यामुळे नाशिकककरांना थंडीचा कडाका जाणवत नव्हता. किमान तापमान मागील दोन आठवड्यांत उच्चांकी 19.9 अंशापर्यंत वाढले होते. यामुळे शहर-जिल्ह्यातून थंडी पूर्णपणे गायब झाली होती. आकाशदेखील निरभ्र राहत नव्हते. ढगाळ हवामानामुळे वातावरणात उकाडाही वाढला होता. मात्र शनिवारपासून थंडी पुन्हा परतली असून किमान तापमानाचा पारा 9.8 अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे शहर व जिल्हावासीय गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत. गेल्या आठवड्यात किमान तापमान 17 अंशापर्यंत स्थिरावले होते.

सोमवारपासून बुधवारपर्यंत किमान तापमानाचा पारा 12 ते 14 अंशाच्या आसपास होता. शनिवारी तो 10.3 अंशापर्यंत खाली आला. थंडीत अचानक वाढ झाल्याने गोदाकाठाबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागात रात्री व पहाट शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.

गहू-हरबर्‍याला पोषक

संपूर्ण जिल्ह्यात थंडीने पुन्हा एकदा आगमन केल्याने या थंडीचा फायदा रब्बी हंगामाला होणार आहे. रब्बी हंगामातील कांदे, गहू, हरभरा, ज्वारीसोबत भाजीपाला पिकांना वाढती थंडी पोषक ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com