Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअकरावीच्या परीक्षा होणार?

अकरावीच्या परीक्षा होणार?

नाशिक ।प्रतिनिधी Nashik

दहावी आणि बारावीच्या परीक्षांची सर्वत्र चर्चा सुरू असताना अकरावीच्या परीक्षांना यंदा ‘खो’ मिळण्याची चिन्हे आहेत. शालेय शिक्षण विभागाने या परीक्षांबाबत कोणतेही आदेश काढले नसल्याने सलग दुसर्‍या वर्षातही या परीक्षा होणार नाहीत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

करोनामुळे ज्युनियर कॉलेजचे प्रथम वर्ष आणि बारावीपूर्वीचे विश्रांतीचे वर्ष समजले जाणारे अकरावीचे वर्ष सर्वाधिक दुर्लक्षित राहिले आहे. करोना काळात अकरावीचे वर्ग ऑनलाइन स्वरूपात झाले होते. अकरावीची परीक्षा केवळ औपचारिकता समजली जात असली तरी ती घेणे सर्व ज्युनियर कॉलेजांना बंधनकारक आहे. मात्र, करोनास्थितीमध्ये ही परीक्षा कशी घेणार, याबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात करोना संसर्ग वाढू लागला होता. त्यावेळेपर्यंत, अकरावीच्या वर्षातील तीन परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. त्या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले होते. मात्र, यंदाची स्थिती मागील वर्षापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. करोनामुळे महाविद्यालयांच्या कोणत्याच परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे, सरासरी गुण देण्याचा पर्याय यंदा अवलंबिता येणार नाही. त्यामुळे, ऑनलाइन परीक्षा घेणे, व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर पाठवून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेणे असे पर्याय यंदा वापरले जाण्याची शक्यता असल्याचे समजते.

करोनामुळे यंदा अकरावीचे प्रवेश उशिरा झाले. त्यामुळे, ऑनलाइन वर्गही उशिराने सुरू झाले होते. मिळालेल्या वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान होते. आता, अकरावीच्या परीक्षा घेण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाकडूनही अकरावीसंदर्भात कोणतेही आदेश न आल्याने कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या