नूतन आयुक्तांच्या काळात प्रकल्प मार्गी लागणार का?

नूतन आयुक्तांच्या काळात प्रकल्प मार्गी लागणार का?

नाशिक । फारुक पठाण Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC) 2017 मधील निवडणूक प्रचारदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निवडणुकीचे चित्र बदलून तब्बल 66 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते व नाशिक महापालिकेत मागील पाच वर्ष एक हाती भारतीय जनता पक्षाची सत्ता होती.या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या काळात घेण्यात आलेले विविध निर्णय तसेच केंद्र सरकारकडून मिळणार्‍या पैशांमुळे विकासकामे झाली तर नाशिक शहरात तब्बल दोन लाख नोकर्‍या उपलब्ध होणार आहे, असा दावा माजी महापौर सतीश कुलकर्णी (Former Mayor Satish Kulkarni)यांनी केला आहे.

कुलकर्णी यांनी करोना काळात देखील मोठ्या प्रमाणात कामे केली. तसेच दिल्ली वारी करून नमामि गोदा प्रकल्पासाठी तब्बल 1823 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्याचप्रमाणे आडगाव परिसरात भव्य असा लॉजिस्टिक पार्क ( Logistics Park )तसेच आयटी हब ( IT Hub )करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी एखाद्या मंत्र्याप्रमाणे काम केल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेचे शहरातील विविध ठिकाणी पडून असलेले भूखंड बीओटी तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. हे सर्व प्रकल्प मार्गी लागले तर नाशिक महापालिकेला वर्षाला सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे उत्पन्न वाढणार तसेच नाशिक शहर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सुमारे दोन लाख स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.

आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क सारख्या प्रकल्पांचा भूमिपूजन झाला आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने त्यावेळी योग्य भूमिका घेतली नसल्यामुळे प्रकल्प रखडले होते. मात्र आता राज्यात सत्ता बदल झाला असून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे. महापालिकेत देखील डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या रूपाने कर्तव्यदक्ष असे आयुक्त लाभल्याने हे प्रकल्प मार्गी लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाठपुरावा करून नमामि गोदा प्रकल्पासाठी केंद्राकडून 1823 कोटी रुपये आणले आहे, त्यासाठी समन्वयक नेमण्याची प्रक्रिया सध्या महापालिकेत अंतिम टप्प्यात आली आहे.

महापालिकेचे आयुक्तांनी थेट गुजरातच्या साबरमती रिव्हर फ्रंटचे डीपीआर देखील मागवले आहे. नाशिकमधील आयटी हबसाठी केंद्राकडून सुमारे 20 कोटी मंजूर असून मुंबई-पुणे नंतर नाशिकमध्ये भव्य आयटी हब होणार आहे. त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले आहे. ताज हॉटेलमध्ये विविध कंपन्यांच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी त्यांची चर्चा देखील झाली असून केंद्रीय मंत्री राणे यांनी महापालिकेने डीपीआर सादर केल्यावर त्वरित मंजुरी देणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र त्यावेळेस राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे महापालिका प्रशासनाने हे काम मनावर घेतले नव्हते तर मार्चमध्ये महापालिकेत प्रशासक राजवट सुरू झाली.यामुळे आयटी पार्कबाबत डीपीआर गेलाच नाही.नाशिकच्या आडगाव परिसरात सुमारे दीड हजार एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या पार्कमुळे यावर आधारित असलेल्या लोकांना, नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सोबतच ज्या मुलांना आयटी हबसाठी मुंबई, पुणे, बंगळुरूला जावे लागायचे त्यांच्यासाठी हा आयटी हब नाशिक येथे मिळणार आहे. राज्यात सत्ता बदल झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजप सत्ता काळातील महापालिकेचे सर्व प्रकल्प मार्गी लागणार असा दावा माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com