Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याउद्योगक्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा सुरू करणार

उद्योगक्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा सुरू करणार

सातपूर । प्रतिनिधी Satpur

शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे उद्योगक्षेत्रातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आला होता.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने तसेच ऑक्सिजनची उपलब्धता वाढल्यामुळे उद्योगक्षेत्राला काही प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचे उद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे.

शहरात वाढती रुग्णसंख्या व ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेतात जिल्हा प्रशासनाने उद्योगक्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो आरोग्यासाठी वळवण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखान्यांना उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली होती. मात्र नजीकच्या काळात कमी होऊ लागलेली रुग्ण संख्या व उपलब्ध होत असलेला ऑक्सिजन सिलेंडरचा अतिरिक्त साठा यामुळे जास्त कामगार संख्या असलेल्या व कमी ऑक्सिजन लागणार्‍या कारखान्यांना पहिल्या टप्प्यात पुरवठा सुरू केला जाणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याचे वृत्त आहे.

रुग्णांना उपचारासाठी उपयुक्त ऑक्सिजन उपलब्ध करून देणे महत्वाचे होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून उद्योग सुरू करून ऑक्सिजन उत्पादन सुरू करण्यात आले. विना वापरात असलेले ऑक्सिजन संकलित करण्यात आले. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या घटल्याने अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होऊ लागल्याने काही औषध उद्योगांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यातही जास्त कामगार संख्या असलेल्या व ऑक्सिजनचे प्रमाण कमी लागणार्‍या कारखान्यांना प्राथमिक तत्वावर पुरवठा दिला जाणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

उद्योगांना गती मिळणार

ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने वैद्यकीय क्षेत्रासाठी उत्पादन करणार्‍या उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला होता. जिल्हा प्रशासनाने उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ऑक्सिजनवर अवलंबून असणार्‍या उद्योगांना गती मिळण्यासह अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

वरूण तलवार, अध्यक्ष, आयमा

ऑक्सिजन उद्योग क्षेत्रात ऑक्सिजन हे महत्त्वाचे घटक आहे. उद्योगांना ऑक्सिजन शिवाय सुरू ठेवणे कठीण होते. मात्र काही अंशाने पुरवठा सुरू होत असल्याने उत्पादन प्रक्रियेला काही प्रमाणात गती मिळणार आहे.

अजय बहेती, भगवती स्टील, सिन्नर

- Advertisment -

ताज्या बातम्या