नाशिकच्या पालकमंत्रीपदी पुन्हा संकटमोचक महाजन?

नाशिकच्या पालकमंत्रीपदी पुन्हा संकटमोचक महाजन?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिपदाचे होऊन नाशिकचे पालकमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे....

नाशिकमधून मंत्रिपद कोणाला मिळेल याबाबत सध्या साशंकता आहे. तरी पालकमंत्री पदावर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याच नावाची जोरदार चर्चा होत आहे. २० जुलैनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत असून यात १२ मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यात नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच सहसंपर्कप्रमुख जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांच्यासह मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devayani Farande) तसेच शिवसेनेच्या वतीने दाभाडीचे आमदार माजी कृषिमंत्री (Former Agriculture Minister) दादा भूसे (Dada Bhuse) व नांदगावचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र रविवारी मुंबईत झालेल्या घडामोडीत महाजन यांचे नाव आघाडीवर आले होते. तसेच पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचे समजते.

दरम्यान, भाजपच्या (BJP) सत्ता काळात गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयासह नाशिकचे पालकमंत्री पद होते. महाजन यांनी त्या काळात संघटना मजबूत करताना नाशिक जिल्हा भाजपमय केला होता. महापालिका निवडणुकीत प्रथमच भाजपकडे एक हाती सत्ता दिली होती. जिल्हा परिषदेत भाजप सदस्य संख्या वाढविली. त्यामुळे सध्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर गिरीश महाजन यांचेच नाव चर्चिले जात असल्याने आता नाशिकचे पालकमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com