Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनेताजींना जाहीर झालेला ‘भारत रत्न’ पुरस्कार का घेतला गेला परत?

नेताजींना जाहीर झालेला ‘भारत रत्न’ पुरस्कार का घेतला गेला परत?

नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता. नेताजी म्हणजे एक अतिशय अद्भुत रसायन. अशक्यप्राय गोष्टी करून दाखवणारे अवलिया व्यक्तीमत्व. १९२०च्या सुमारास ब्रिटिश साम्राज्यातील अतिशय प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन ते प्रमाणपत्र ब्रिटनमध्येच फेकून देणारा प्रखर देशप्रेमी व्यक्तीमत्व. काँग्रेसमध्ये राहून महात्मा गांधीजींना विरोध करून पराभूत करणार एकमेव व्यक्तिमत्त्व. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारताच्या शत्रूशी लढण्यासाठी अक्षरश: हिटलर सारख्या व्यक्तीशी मैत्री करणारे सेनानी. अशा महान नेत्यांचा आज जन्मदिन. जाणून घेऊ त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना…

१) २३ जानेवारी १८८७ रोजी कटक मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनचं ते बंडखोर वृत्तीचे होते. नेताजींना ८ भावंडे होती. त्यांचा क्रमांक ९ वा होता. त्यांना शालेय जीवनातच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी, नेताजींनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. पण त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनवले.

- Advertisement -

२) भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या इराद्याने नेताजींनी इंडियन सिव्हील सर्विस मधील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीला लाथाडले. पहिली सक्तीची एक वर्षाची उमेदवारी न करता सरळ नोकरीचा राजीनामा देऊन स्वदेशाची वाट धरली.

३)काँग्रेसचे धोरण जहाल असावे व काँग्रेसने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा बदलत्या राजकारणात अनुकूल फायदा करून घ्यावा, या उद्देशाने ते काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले. महात्मा गांधींच्या विरोधास न जुमानता त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली व पट्टाभिसीतारामय्या यांचा पराभव करून ते अध्यक्ष झाले. या निवडणुकीमुळे म. गांधी नाराज झाले. त्यांनी हा आपलाच पराभव आहे, असे मानले. बहुसंख्य सभासदांनी गांधीचे नेतृत्व मान्य केल्यामुळे सुभाषबाबूंनी एप्रिलमध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मेमध्ये फॉर्वर्ड ब्लॉकची स्थापना केली.

४) आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले. १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.

५) युरोपमध्ये सुभाषबाबू विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.

६) १६ जानेवारी १९४१ रोजी इंग्रजांच्या नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. त्यानंतर पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.

७) बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो या दोन्हींची स्थापना केली. या दरम्यान सुभाषबाबू नेताजी नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.

८) नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.

९) द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली.

१०) ६ जुलै १९४४ रोजी आझाद हिंद रेडियोवरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. या भाषणात नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

११) २३ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

१२ ) दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानने शरणागती पत्करली होती. त्या वेळी अमेरिकन जनरल मॅक्आर्थर यांनी जपानवर ताबा मिळवला होता. मॅकआर्थर नेताजींच्या शोधासाठी वेडापिसा झाला होता. त्याने जपानमध्ये नेताजींचा कसून शोध घेतला; परंतु खूप प्रयत्नांनंतर त्याचे असे मत बनले की, सुभाषचंद्रांचा मृत्यू विमान अपघातात झाला असावा. त्यांनी तशाप्रकारे लिहिलेला गुप्त अहवाल युद्धकालीन कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे.

१३) २३ जानेवारी १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद कोलकोता न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आला. यामुळे त्यामुळे त्यांना जाहीर झालेला भारत रत्न पुरस्कार काढून घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची भारतीय इतिहासातील ही एकमेव घटना आहे.

१४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हे आजवर न उलगडलेले कोडे आहे. भारत सरकार देखील हे प्रकरण शांतचं ठेवण्याचा प्रयत्न करते. असे म्हटलं जातं की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला, परंतु त्यांच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत. याच कारणामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक रहस्य बनून राहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या