कोण मारणार बाजी?

नाशिक पदवीधरमध्ये संभ्रमाची स्थिती
कोण मारणार बाजी?

नाशिक । विजय गिते Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. रिंगणात 16 उमेदवार असले तरी मुख्य लढत अपक्ष व पूर्ण ताकदीनिशी उतरलेले सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या शुभांगी पाटील यांच्यात आहे.

दोन्ही उमेदवार अपक्ष असले तरी कोण कोणाला पाठिंबा देत आहे? कोण कोणाचे काम करीत आहे? याबद्दल तांबे आणि पाटील अशा दोन्ही बाजूंकडील कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे चित्र मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत दिसून आले. राजकारणात जर-तरला काहीच अर्थ नसला तरी जो-तो आपापल्या परीने निवडणुकीबाबत तर्क लावत आहे. मामा आणि पिताश्रींकडून राजकीय बाळकडू मिळालेले सत्यजित निवडणुकीत बाजी मारतात की ऐनवेळी महाविकास आघाडीत डेरेदाखल झालेल्या शुभांगी पाटील सहानुभूती मिळवतात याचा निर्णय सोमवारी (दि.30) होणार आहे.

विधान परिषदेची निवडणूक सुशिक्षित मतदारांची ही निवडणूक असते. ही निवडणूक लागली की सर्वसामान्य जनतेला ती केव्हा आली आणि केव्हा गेली हे लक्षात येण्यापूर्वीच संपूनही गेलेली असते. मात्र या वेळची आणि त्यातही नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यभर चर्चेत राहीली आहे. त्यामुळेच ही निवडणूक एका अर्थाने मतदारांचीही परीक्षा घेणारी असेल.

निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नवे राजकीय वळण मिळाले. त्यात काँग्रेसने दोन कोरे एबी फॉर्म पाठवल्याचा दावा केला. मात्र आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत आपण भाजप, मनसेना यांसह सर्वांचा पाठींबा मागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जो गोंधळ उडाला त्यात काँग्रेसची पुरती शोभा झाली. तांबे सांगा कुणाचे? भाजपचे की इतर कोणाचे? असा गोंधळ निर्माण झाला. तो शेवटपर्यंत कायम राहिला.

भाजपने याठी खेळी करीत उमेदवार न देता तांबे यांच्या मागे 'हात' कोणाचा याबाबत उघड निर्णय घेतलाच नाही. त्यामुळे पदवीधर मतदारांत गोंधळ झाला, तो अजूनही कायम आहे. यातही सत्यजित तांबे यांचे मामा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात कोणत्याच पिक्चरमध्ये पुढे आलेले नसून ते अलिप्त आहेत. त्यांची काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेने भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदार असलेल्या शुभांगी पाटील यांना आपल्या कळपात आणून पाठींबा जाहीर केला. पार्टी वुइथ डिफरन्स म्हणणार्‍या भाजपकडे तीन-तीन इच्छुक असतानाही त्यांनी उमेदवारच दिला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजपला निवडणूक लढवण्यापेक्षा काँग्रेसला घरघर लावण्यात रस होता.

त्यात ते यशस्वी झाले असले तरी मात्र मतदारांना ते कितपत पटले हे निकालावेळी कळेलच. दुसरीकडे त्यांच्या विरोधक शुभांगी पाटील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत डेरेदाखल झाल्या आहेत. त्यांना शिवसेनेबरोबरच आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली मुंबईतील संपूर्ण टीम नाशिक विभागात प्रचारासाठी पूर्ण तयारीनिशी उतरवली आहे. त्यामुळे पाटील यांना आपसूकच प्रचाराचे फार कष्ट न घेताही त्यांचे नाव घराघरातच नव्हे तर राज्यभर पोहचले. त्यांना प्रचारात मिळालेली सहानुभूती त्यांना यशाच्या वाटेपर्यंत कुठपर्यंत घेऊन जाते आणि सत्यजित तांबे यांना राजकारणातील लहानपणापासूनच मिळालेले बाळकडू किती फायदेशीर ठरणार? हे आज मतदान आणि बुधवारी (दि.2) मतमोजणीतील निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com