Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्रत प्रगतीच की परिवर्तन?

मविप्रत प्रगतीच की परिवर्तन?

नाशिक । विजय गिते Nashik

एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections ) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता रविवारी मतदान झाले.

- Advertisement -

मविप्रत ‘प्रगती’च की होणार ‘परिवर्तन’? कौल कुणाला? मविप्रचा कारभारी कोण? याबाबतचा फैसला सोमवारी (दि.29) सायंकाळपर्यत होईल. या पार्श्वभूमीवर मतदानोत्तर आकडेमोडीला उधाण आलेले आहे. पुन्हा ताईच की साहेब यावर खलबते सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत मविप्र समाज संस्थेच्या निवडणुकीला मोठे महत्त्व येत गेले. याची प्रचिती यावेळी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सार्वजनिक निवडणुकीलाही लाजवेल असा साम, दाम, दंड या तीनही गोष्टींचा पुरेपूर वापर या निवडणुकीत होऊ लागला आहे. त्यामुळे शिक्षणाचे मंदिर म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या शैक्षणिक संस्थेला असे बाजारू स्वरूप येऊ नये, असे कितीही वाटत असले तरी सर्वच स्तरांवर सध्या जे रूप या निवडणुकीला आले आहे, ते पाहिले तर कर्मवीर, समाजधुरिणांचा या सासाठी केला होता का अट्टहास, असा प्रश्न सभासदच नव्हे तर भावी पिढीलाही पडला तर नवल नाही. आद्य संस्थापकांनी काबाडकष्ट करून, प्रसंगी पोटाला नव्हे तर आयुष्यालाच चिमटे घेऊन ही संस्था उभारली, याचा विचार नव्याने कारभारी होणार्‍या कार्यकारी मंडळाने करणे काळाची गरज आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंद आहेत. जिल्हा बँकही ठप्प असून महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आरक्षणांमुळे अनेकांची राजकीय अडचण होऊन बसली आहे. अशा सर्वच स्थानिक निवडणुका ठप्प असल्याने मराठा समाजाने राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मविप्रचा आधार घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळेही मविप्र निवडणुकीला कोण महत्त्व आले आहे. भाऊ, साडू, व्याही, जावई, मेव्हणे, काका, पुतणे असा सारा नात्यातच राजकीय आखाडा रंगला आहे. त्यामुळे सभासद मतदारांनाही संभ्रम पडावा अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्याने समाजातील महिलांनाही संस्थेच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे.दहा वर्षे नीलिमा पवार याही सक्षमपणे नेतृत्व करत आहेत.

या निवडणुकीत प्रमुख सरचिटणीस पदासह, अध्यक्ष व सभापती पदाची लढत रंगणार असली तरी पहिल्यांदाच उपाध्यक्ष व दोन महिला सदस्यही या निवडणुकीतून निवडले जाणार असल्याने या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या