पर्यटनस्थळी हुल्लडबाजी रोखणार कोण?

पर्यटनस्थळी हुल्लडबाजी रोखणार कोण?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील जवळपास सर्वच पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी ( Crowd in Tourist Places) दिसून येत आहे. याठिकाणी हिरवाईची शालच जणू पांघरली गेली असून पावसाळी पर्यटन सध्या वाढलेले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत तरुणाई सध्या फिरताना नजरेस पडते आहे. अनेक पर्यटन स्थळांना सुरक्षेच्या अपुर्‍या व्यवस्था आहेत. तसेच पर्यटनाचा अनुभव नसलेल्यांची देखील मोठी गर्दी याठिकाणी होत असल्यामुळे अपघातदेखील होण्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्ह्याच्या दुर्गम पट्ट्यात पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीतील वाहणारे धबधबे ( Water Falls )नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. धरणे ओसंडून वाहत आहेत. घाटमाथा हिरवाईने फुलला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पावसाची तीव्रता कमालीची वाढली होती. यामुळे, या पर्यटनाला अधिकचा बुस्ट मिळाला खरा परंतु वाढलेले अपघात, अनुचित प्रकार, व्यसनी व अति उत्साही हुल्लडबाजांच्या टोळक्यांकडून पर्यटन स्थळीं वाढलेली दहशत, गडकिल्ल्यांच्या भूमीत टवाळखोरांकडून होणारी ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड या दुर्दैवी प्रकारांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे.

त्र्यंबकेश्वरमधील हरिहर किल्ल्यावर वाढलेल्या गर्दीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर वनविभ्गाने हा गड काही दिवस पर्यटनासाठी बंद केला. बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावरदेखील अशीच एक घटना घडून एका तरुणाचा जीव गेला. याठिकाणीदेखील वनविभागाने पर्यटनाला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. या घटना घडू नयेत यासाठी खर्‍या अर्थाने प्रयत्न झाले पाहिजेत असे अनेक दुर्गप्रेमी सांगत आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत कोसळणारे दुगारवाडी, बुरुंडेश्वर, भावली, वरसविहिर, भंडारदरा, तास, धबधबे, हरसूल, सुरगाणा, त्रंबकेश्वर येथील नैसर्गिक जव्हार, हरसूल घाट, पश्चिम पट्ट्यातील गंगापूर, अंबोली, कश्यपी, गौतमी, दारणा, भावली, वैतरणा धरण परिसर, विविध लेणी, तसेच हरिहर, दुर्गभांडार त्रंबकगड, रामशेज, हतगड, अंकाई टन्काई व साल्हेरसह अनेक किल्ल्यांवर शनिवार रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

यात काही अभ्यासू, कुटुंबासह आलेले पर्यटक सोडले तर बहुतांशी टोळक्याने आलेले अनेक उत्साही मंडळी बेशिस्त वागतात. नो सेल्फी झोन असतांना फोटोसाठी, धरणाच्या काठावर, धबधब्याच्या पाण्यात किंवा गडकिल्ल्यांच्या धोकेदायक कड्यावर उभे राहून बसून फोटो, सेल्फी काढतात. फोटोच्या मोहापायी तसेच पर्यटनस्थळी रेन डान्स करणे, स्वतःहोऊन धोका पत्करणे, स्टंट करणे, जोरदारपणे घाटात मोटारसायकली पळवणे, प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी नाचणे, शिट्ट्या वाजवणे, जोरजोरात ओरडणे, रस्त्यात चारचाकी गाडीत म्युझिक लावून मिळेल तिथे नाचणे यामुळे त्या-त्या स्थानिकांना व शिस्तबद्ध पर्यटकांना याचा त्रास होत आहे.

रामशेज, हरिहर गडकिल्ल्यांच्या माथ्यावर तर हजारो पर्यटक शनिवार रविवारी येतात. किल्ल्याच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड होत आहे. किल्ल्यावर तोफेवर बसून अनेकांचे फोटोसेशन होते. हे फोटो अनेकदा समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत. पर्यावरणाला हानी तर पोहोचतेच शिवाय प्लास्टिक कचरा वाढतो आहे.

ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी भागात धबधबे, सह्याद्रीत 60 हुन अधिक ऐतिहासिक किल्ले, पश्चिम पट्ट्यातील नैसर्गिक धरणे, जंगल, घाट, नद्या, पुरातन देवस्थाने या ठिकाणी पर्यटन दिवसागणिक वाढत आहे. गडकिल्ले, धबधबे, धरणे, घाट ज्याठिकाणी पर्यटक गर्दी तिथे पोलीस यंत्रणा,आपत्कालिन यंत्रणा आवश्यक आहे. मात्र बहुतांशी ठिकाणी सुरक्षा नाही, सध्या पर्यटन स्थळी वाढते धिंगाने, हुल्लडबाजीला आळा बसेल कसा?

- राम खुर्दळ,संस्थापक, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक

आदिवासी भागात पर्यटनाला खूप संधी आहे. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, जव्हार, हरसूल भागात मोठ्या प्रमाणात घाट, जंगल, वनक्षेत्र व धबधब्याचे, गडकिल्ले असे मोठे पर्यटन क्षेत्र आहे. येथील संस्कृती लोककला ही मोठा ठेवा या भागातील दारिद्य्र, बेरोजगारी घालवायची तर पर्यटन वाढवले पाहिजे.

- देवचंद महाले, नागरिक हरसूल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com