Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यात्र्यंबकेश्वर मद्यमुक्त कधी होणार?

त्र्यंबकेश्वर मद्यमुक्त कधी होणार?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आणि संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या संजीवन समाधीसह विविध धार्मिकस्थळे असल्याने त्र्यंबकेश्वरला देशासह महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, हेच त्र्यंबकेश्वर आता मोठ्या प्रमाणावर खुलेआम होणार्‍या मद्यविक्रीमुळे चर्चेत आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील काही महत्वाच्या धार्मिकस्थळांच्या ठिकाणी मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून मंदिर परिसरात मद्यविक्रीस मनाई करण्यात आली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे शहर त्याला अपवाद ठरले असल्याचे दिसत आहे.

त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर असल्याने देशभरातून लाखो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परंतु, या भाविकांना त्र्यंबकमध्ये आल्यावर अनेकदा मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यातील काही मद्यपी भाविकांची लूट तर काही जण महिलांशी गैरवर्तन करतांना दिसून येतात. त्र्यंबकेश्वर शहरातील महत्वाच्या ठिकाणी काही बड्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर मद्याची दुकाने आणि बिअरबार थाटले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील तरुणाई दिवसेंदिवस नशेच्या आहारी जातांना दिसत आहे.

त्यातच या वाढत्या मद्याच्या व्यसनामुळे मंदिर परिसरासह शहरातील इतर ठिकाणी हाणामारीसह अनेक प्रकारचे गुन्हे घडत असतात. यामुळे त्र्यंबक शहरातील नागरिकांसह भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने खुलेआम मद्याची विक्री करणारी दुकाने आणि बिअर बार यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

तरुणाई मद्याच्या आहारी

त्र्यंबकेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील लोकांची वर्दळ असते.यामध्ये तरुणाईचा त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर राबता पाहायला मिळतो. यातील काही तरूण हे कामानिमित्त तर काहीजण मौजमजेसाठी येतात. मात्र, यामधील काही तरुण हे त्र्यंबकमधील विविध मद्य दुकाने आणि बिअर बारमधून मद्य विकत घेऊन तेथेच पितांना दिसतात. तर काही जण मद्य घरी नेऊन पितात. यामध्ये अगदी 18 वर्षांच्या तरुणांचा देखील समावेश असतो.

त्र्यंबकेश्वर येथे बिअरबार चालकांकडे मद्यविक्रीचा अधिकृत परवाना असल्याने बिअरबार बंद करण्याचा अधिकार आम्हाला नसून तो राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. त्यामुळे बिअरबार चालकांवर राज्य सरकारच प्रत्यक्षपणे कारवाई करू शकते. परंतु, भाविकांना एखाद्या मद्यपीने त्रास दिला आणि त्याची तक्रार आमच्याकडे आली तर महाराष्ट्र (मुंबई) दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कारवाई केली जाते.

बिपीन शेवाळे, पोलीस निरीक्षक, त्र्यंबक पोलीस स्टेशन

सध्याच्या स्थितीत मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या जेवणासाठी फक्त रेस्टॉरंट सुरु असून, कुठल्याही प्रकारचे बिअरबार सुरु नाहीत. तसेच मंदिराच्या परिसरात एखादा मद्यविक्री करतांना आढळून आल्यास त्याच्यावर पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करण्यात येईल. याशिवाय एखादा मद्यपी भाविकांशी गैरवर्तन करतांना आढळल्यास त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल.

श्रिया देवचके, मुख्याधिकारी, त्र्यंबक नगर परिषद

ग्रामीण भागात मद्यविक्री जोमात

एकीकडे त्र्यंबकेश्वर शहरातील काही महत्वाच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होतांना दिसते. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागांमधील अनेक गावांमध्ये किराणा दुकानांत किंवा इतर ठिकाणी मद्यविक्री सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. याठिकाणी त्र्यंबकपेक्षा दुप्पट किमतीत मद्याची विक्री होते. तसेच अनेकदा पोलिसांकडून ग्रामीण भागातील या मद्यविक्री करणार्‍यांवर कारवाई देखील करण्यात येते. परंतु, काही दिवसांनंतर पुन्हा हे लोक जोमात मद्यविक्री करतांना दिसतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या