
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक महापालिकेच्या (NMC's Schools )सुमारे 69 शाळा स्मार्ट करण्याच्या निर्णय नाशिक महापालिकेने घेतला होता. यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून सुमारे 70 कोटी रुपये देखील मिळणार आहे, मात्र त्याबाबत कोणत्याही प्रकारे प्रगती होत नसल्यामुळे महापालिकेच्या शाळा स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील दोन महिन्यांपूर्वी याबाबत आढावा घेऊन त्वरित कारवाई करण्याच्या आदेश दिले होते.
स्मार्ट सिटीकडून मिळणार्या 70 कोटी रुपयांच्या माध्यमातून नाशिक महापालिकेच्या शाळा स्मार्ट करण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कंपनी असलेल्या पॅलॅडियम कंपनीशी बोलणी देखील झाली होती. याच कंपनीने दिल्ली, तसेच कर्नाटकमधील शाळा मॉडेल तयार केले आहेत.
यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकार्यांचे शिष्टमंडळ देखील दिल्लीवारी करणार होता, मात्र शाळा स्मार्ट करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणतेही ठोस कारवाई होत नसल्यामुळे व दुसरीकडे 2023 मध्ये स्मार्ट सिटी कंपनी आपले कामकाज गुंडाळणार आहे. यापूर्वी जर हे काम झाले नाही तर स्मार्ट शाळा होणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील शिकण्याची जी पद्धत आहे, त्याच पद्धतीने त्यांना शिकवण कसे देता येईल, याबाबत विचार होणार आहे. दिल्ली सरकारने जे शाळा तयार केले आहे ते अत्यंत उच्च दर्जाच्या आहे. त्यामुळे नाशिक मनपा अधिकार्यांंचा शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन तेथे शाळांच्या कामकाजाचा व मॉडेलचा अभ्यास करणार होते. यासाठी तत्कालीन मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे प्रयत्नशील होते. मात्र ते सेवानिवृत्त झाले तरी शिष्टमंडळ दिल्लीला गेला नाही.
खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिका स्मार्ट स्कूल योजना राबविणार आहे. शहरात महापालिकेच्या 102 शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 29 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. महापालिका शाळांच्या शैक्षणिक दर्जा खासगी शाळांच्या तुलनेत चांगला नसल्याने मध्यमवर्गीय पालकही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतात. त्यामुळे महापालिकेच्या शाळा ओस पडत आहेत. स्पर्धेच्या युगात डिजिटलला महत्त्व आले आहे. लॉकडाऊन असल्याने डिजिटलचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे डिजिटल युगात खासगी शाळांशी स्पर्धा करण्यात महापालिकेच्या शाळा कमी पडू नये. त्यामुळे स्मार्ट स्कूल योजना राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला होता.
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे
पालकमंत्री दादा भुसे यांनी दोन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या पंचक भागातील शाळा क्रमांक 49 मध्ये बैठक घेत स्मार्ट स्कूल प्रकल्पाचा आढावा घेतला होता. यावेळी शाळा स्मार्ट करण्याबरोबर स्वच्छतागृहे, कंपाऊंड, खेळ सामुग्री, डिजिटल साहित्य या मुद्यांकडेही लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली होती. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर देखील महापालिका प्रशासनाने त्वरित याबाबत कारवाई सुरू केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या 69 शाळा स्मार्ट होणार का की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुन्हा पालकमंत्री भुसे यांनी या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.