काँग्रेसला पूर्णवेळ शहराध्यक्ष कधी मिळणार?

काँग्रेसला पूर्णवेळ शहराध्यक्ष कधी मिळणार?

नाशिक | विजय गिते | Nashik

तब्बल सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या नाशिक शहर काँग्रेस अध्यक्षपद (Nashik City Congress President) निवडीला मुहूर्त कधी? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांनी त्यासाठी जोर बैठका काढायला सुरुवात केली आहे...

प्रदेश कार्यकारिणीत (Executive Body) एकीकडे एकट्या नाशिक जिल्ह्याला (Nashik District) तब्बल दहा पदाधिकार्‍यांचा समावेश करत प्रतिनिधित्व देण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

दुसरीकडे मात्र शहराध्यक्ष पदाला योग्य उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका आहे. योग्य व्यक्ती या पदासाठी मिळत नसल्यानेच ही नियुक्ती लांबणीवर टाकली जात असल्याची चर्चा आहे.

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या (Nashik NMC Election) तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीसह (NCP) सर्वच राजकीय पक्ष कसून कामाला लागले असताना काँग्रेस (Congress) पक्ष मात्र शहराध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात आहे.

विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेनेने पक्षीय पातळीवर मेळावे घेत वातावरण निर्मिती सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या गोटात कमालीची शांतता दिसून येत आहे.

काँग्रेस पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असल्याने सत्तेच्या मार्फत शहर व जिल्ह्यात पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याचे पक्षातील ज्येष्ठ मंडळी सांगत आहेत.

दुसरीकडे काही स्वयंघोषित इच्छुकांच्या आशा यानिमित्ताने पल्लवित झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात दौरे सुरू केले तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून पक्षात उत्साह संचारण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यालाही नाशिकचा अपवाद ठरला.त्यांचा नाशिक जिल्हा संघटनात्मक दौरा रद्द झाल्याने या ठिकाणी नवीन कार्यकारिणीची निवड लांबणीवर पडली.

आता पुन्हा प्रदेश कार्यकारिणीत आजी-माजी ज्येष्ठ, तरुणांना स्थान दिल्याने पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये काहीसा उत्साह निर्माण झाला आहे. हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी शहराध्यक्षपदी अनुभवी चेहर्‍याची निवड लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे.

इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींशी संपर्क

शहराध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या इच्छुकांमध्ये प्रभारी अध्यक्ष शरद आहेर व डॉ.हेमलता पाटील, राहुल दिवे यांची नियुक्ती प्रदेश कार्यकारिणीत झाल्याने त्यांचे नाव आपोआपच बाद झाले आहे. उर्वरित इच्छुकांमध्ये भारत टाकेकर, नगरसेवक गुरुमित बग्गा, माजी अध्यक्ष आकाश छाजेड, बबलू खैरे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून प्रत्येकाने पक्षश्रेष्ठींशी संपर्क सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com