Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक खड्डेमुक्त कधी होणार? पालकमंत्र्यांचा आदेशही धाब्यावर

नाशिक खड्डेमुक्त कधी होणार? पालकमंत्र्यांचा आदेशही धाब्यावर

नाशिक । फारुक पठाण Nashik

यंदा पावसाळा ( Rainy Season )खूपच लांबला. यामुळे शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते. मात्र सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे तर दोन आठवड्यांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse)यांनी पंधरा दिवसांत शहरातील खड्डे ( Pits On Roads ) बुजवा अन्यथा कारवाईचा इशारा मनपाला दिला होता. त्यांच्या अल्टिमेटमची मुदत संपली तरी शहरात खड्डे कायम आहेत. नाशिक शहर खड्डेमुक्त कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

- Advertisement -

नाशिक महापालिकेने शहरातील खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तरीही शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर खड्डे कायम आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण सुरू असले तरी रस्ते खड्डेमुक्त झाल्याचे दिसत नाही. शहरातील महत्त्वाच्या अशा शालिमार चौक परिसरात तसेच खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, वडाळा नाका, द्वारका, टाकळी फाटा, काठेगल्ली सिग्नल, शिवाजी रोड आदी प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी कधीही डांबरीकरण झालेले नाही, मात्र पावसाळ्यात या ठिकाणी काहीवेळा खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला, तोही फोल ठरला. त्यामुळे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शहरातील रस्त्यांची कामे ज्या ठेकेदाराकडून होतात त्या ठेकेदाराकडे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे तीन वर्षे मेंटेनन्सची जबाबदारी असते. त्याला लायबिलिटी पिरेड असे म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील सुमारे 45 रस्त्यांवर जे खड्डे झाले होते ते ठेकेदाराच्या लायबिलिटी पिरेडमध्ये होते. यामुळे तेथील खड्डे त्या ठेकेदाराकडून बुजवण्यात आले. मात्र दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की, एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर खड्डे पडलेच कसे? महापालिकेचा दर्जा तपासणी विभाग असताना ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम झाले का, ज्यामुळे रस्ते तयार झाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच पावसाळ्यात त्यांच्यावर खड्डे पडले. त्यामुळे महापालिकेचा दर्जा नियंत्रण विभागदेखील सध्या टार्गेटवर असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न काही नवीन नाही. मात्र यंदा खड्डेमुक्त शहर करण्यासाठी महापालिकेला अपयश आल्याचे दिसत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी अल्टिमेटम देऊनही कामात सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन

नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने तसेच शहर खड्डेमुक्त व्हावे, यासाठी वेळोवेळी आंदोलन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन खड्डे या विषयावर चर्चा केली. त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. मात्र महापालिकेतील इतर काही अधिकारी तसेच ठेकेदाराची मिलीभगत असल्यामुळे कामे लवकर होत नाहीत, काही कामे निकृष्ट होतात. नाशिक शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही पद्धतीने महापालिकेसमोर आंदोलन करेल.

अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसेना

आज शहर अभियंत्यांची भेट घेणार

नाशिक शहर खड्डेमुक्त व्हायला पाहिजे. पालकमंत्री यांनी दिलेली मुदत संपत आहे. सोमवारी मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांची भेट घेणार आहोत. शहरातील नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर सर्व खड्डे बुजवावे.

प्रवीण तिदमे, शहराध्यक्ष, बाळासाहेबांची शिवसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या