राज्यात कशी असेल हवामानाची स्थिती? जाणून घ्या अंदाज

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत
राज्यात कशी असेल हवामानाची स्थिती? जाणून घ्या अंदाज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकसह महाराष्ट्र राज्याच्या बर्‍याचशा भागात ढगाळ वातावरण असून सध्या ग्रामीण भागात खळ्यावर खरीपाची काढणी व उघड्यावर धान्य राशी सुकवणी, वाळवणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण असून ते धास्तावलेले असल्याचे चित्र आहेत.

मात्र, महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची पावसासाठी प्रणाली नसून पावसाची शक्यता मुळीच नाही, असे दिसते. त्यामुळे बिनधास्त असावे, अशी परिस्थिती आहे. मंगळवारपासून महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पहाटेच्या किमान तापमानात विशेष फरक जाणवणार नसुन शुक्रवार दि.11 नोव्हेंबरपासून पुढील 3 दिवस म्हणजे रविवार दि. 13 नोव्हेंबरपर्यंत मात्र किमान तापमानात 3 अंशांपर्यंत घसरण होऊन सध्यापेक्षा जास्त थंडी जाणवेल. विशेषतः खान्देशात या थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल. दुपारचे सध्याचे कमाल तापमानात सरासरी 2 अंश वाढ- फरकामुळे महाराष्ट्रात दुपारचे तापमान ऊबदार जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

द्राक्ष उत्पादक चिंतेत

दरम्यान, मंगळवारी (दि.8) जिल्ह्यात दिवसभर काहीसे ढगाळ व धुरकट वातावरण होते.त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणामुळे अर्ली द्राक्ष बागांवर तसेच फळभाज्या व पालेभाज्यांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा औषध फवारणीचा आर्थिक बोजा येणार असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे.

ज्याप्रमाणे चार महिन्याच्या पावसाळ्यात उत्तर भारतात 25 डिग्री पूर्व-पश्चिम अक्षवृत्ताच्या दरम्यान कमी दाब क्षेत्र पॉकेट्सला भेदून जाणारी रेषा म्हणजे मान्सूनचा आस. तसा हिवाळ्यात 15 ऑक्टोबरनंतर ते चार फेब्रुवारीपर्यंत त्याच ठिकाणी उच्च दाब क्षेत्र पॉकेट्स तयार होतात. यालाच आपण प्रत्यावर्ती चक्रीय क्षेत्रे म्हणतो .सध्या अशी अनेक क्षेत्रे असून त्यांना पूर्व -पश्चिम भेदून जाणारी रेषा म्हणजे त्याला आस च्या विरुद्ध म्हणजे म रीज म म्हणतात. प्रत्यावर्ती चक्रीय क्षेत्रमधील वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे फिरत असल्यामुळे राजस्थान, पंजाबमधील एका प्रत्यावर्ती चक्रीय क्षेत्रामधील वर्तुळकार वारा मध्यप्रदेश, विदर्भातून रहाटगाडयाप्रमाणे अरबी समुद्रात घुसून प्रचंड आर्द्रता गाडग्यात भरून पुढील गरक्यात उत्तर भारतात व तसेच महाराष्ट्रातही ओतून गाडगे खाली (रिते) करतो व पुन्हा आर्द्रता भरण्यास अरबी समुद्रात घुसतो. म्हणून सध्या महाराष्ट्रात गाडग्याने ओतलेल्या आर्द्रतेमुळे, आर्द्रता प्रमाण वाढीमुळे व असलेल्या थंडीमुळे ढगाळ वातावरण आहे. मात्र, पाऊस होणार नाही.

माणिकराव खुळे, निवृत्त हवामान तज्ञ, पुणे वेधशाळा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com