दसऱ्याच्या या कथा तुम्हास माहिती आहे का?

दसऱ्याच्या या कथा तुम्हास माहिती आहे का?

विजयादशमी’ म्हणजेच ‘आश्विन शुद्ध दशमी’ हा दिवस ‘दसरा’ म्हणून साजरा केला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे ‘नवरात्र’ साजरे केले जातात आणि दहाव्या दिवशी ‘विजयादशमी’ साजरी करण्यात येते. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते.

१) भगवान श्रीराम यांनी सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी लंकेवर चढाई केली होती. यात रावणाचा वध झाला. रावणावर श्रीराम यांनी मिळवलेला विजय हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.

२) दुर्गा मातानेही महिषासूर राक्षसाचा वध करून सर्व देवतांना आणि मनुष्यांना त्याच्या अत्याचारातून मुक्ती दिली होती. तो दिवस होता दसरा. विजयादशमीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याची मात तसेच असत्यावर सत्याचा विजय मानला जातो.

३) पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शास्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस. त्यामुळे या दिवशी शस्त्र पूजन केले जाते.

४) फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. या ऋषींकडे 'कौत्स' नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने ऋषींना विचारले कि, "मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

कौत्स हे ऐकून तो रघुराजाकडे गेला. राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटले पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळाले तो दिवस दसऱ्याचा होता.त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोने म्हणून देतात-घेतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com