Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यातुम्हाला साप दिसला तर?

तुम्हाला साप दिसला तर?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाळ्याचे दिवस ( Rainy Season )सुरु झाले की सापही दिसायला लागतात. साप ( Snake )दिसला तरी माणसाची बोबडी वळते. साप चावला या भावनेने माणसांचा रक्तदाब वाढतो. त्यांच्या ह्यदयक्रियेवर ताण येतो. पण सगळेच साप विषारी नसतात. ते कसे ओळखायचे? साप दिसला तर आणि चुकून तो चावला तर काय करायचे? सापांबाबत कोणचे गैरसमज प्रचलित आहेत? याची माहिती देत आहेत मानद वन्यजीव रक्षक आणि ईकोएको फाउंडेशनचे वैभव भोगले. ( Vaibhav Bhogle- Ecoeko Foundation )

- Advertisement -

साप दिसला तर?

तुमच्या घराच्या कंपांऊंडबाहेर एखादा मोकळा प्लॉट असेल किंवा मोकळी जागा असेल, तिथे झाडेझुडूपे असतील आणि तिथे साप राहाण्याजोगी जागा असेल तर खरेतर सापाला त्याच्या त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे. पण साप हलत नसेल, किंवा त्याला हालचाल करायला जड जाते आहे, त्याला जखम झाली आहे असे आढळले तर वनखात्याशी किंवा स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधावा.

साप सोसायटीच्या आवारात पार्किंगमध्ये किंवा घरात शिरला तर?

घाबरु नका. पॅनिक होऊ नका. गोंधळ घालू नका. सापाच्या जवळ जाऊ नका. त्याच्यावर लांबून लक्ष ठेवा आणि वनविभागाला कळवा.

घरातील किंवा गच्चीवरच्या बागेत काय काळजी घ्यावी?

बर्‍याच वेळा घरात किंवा गच्चीवरच्या बागेत कुंड्या खूप जवळजवळ ठेवलेल्या असतात. दाट झाडी असते. पण या काळात दोन कुंड्यांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. म्हणजे तिथे काही बसलेले असेल तर लगेच दिसते. कुंड्या ठेवलेला परिसर किंवा गच्चीवरच्या बागेचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवावा. पालापाचोळा तसाच ठेऊ नये.

साप चावला तर काय करावे?

साप चावला तर फार तर ती जखम स्वच्छ धुवावी आणि त्वरित जिल्हा किंवा सरकारी रुग्णालयात जावे. आणि डॉक्टरांना दाखवावे. रुग्णालयात जाण्याआधी घरचे घरी प्रथमोपचार करायच्या भानगडीत पडू नये. कारण घाईगडबडीत ते चुकीच्या पद्धतीने झाले तर त्रासदायक ठरु शकते.

साप चावला म्हटल्यावर तो माणूस एकदम घाबरुन जातो. त्याला प्रचंड भीती वाटायला लागते. आता आपण मरणार अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि विष शरीरभर पसरायचा धोका वाढतो. अशा वेळी त्याच्याबरोबरच्यांनी त्याला मानसिक आधार द्यावा आणि त्वरित सरकारी दवाखान्यात न्यावे.

कोणते साप विषारी असतात?

आपल्याकडे मोजून चारच विषारी साप जास्त प्रमाणात सापडतात. ते सोडून बाकीच्या सापांपासून धोका नसतो. विषारी साप कोणते? 1) नाग 2) मण्यार 3) फुरसे आणि 4) घोणस.

ते ओळखायच्या काही कॉमन खुणा?

नाग डिवचला गेला तर फणा काढून उभा राहातो आणि फुस्स असा आवाज काढतो. मण्यार संध्याकाळी सात वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंतच अ‍ॅक्टिव्ह असतो. ओळखायची सोपी खूण म्हणजे चकचकीत काळ्या रंगावर आडवे पांढरे पट्टे. फुरसे शक्यतो शहरात आढळणे दूर्मिळ होत चालले आहे. शहराबाहेरही फारसे आढळत नाही. फुरशाच्या डोक्यावर बाणाच्या आकाराची खूण असते. आणि त्याला डिवचले तर ते स्वत:च्या शरीरावरील खवले एकमेकांवर घासून लाकडावर आरी चालते तसा आवाज करते. चौथा घोणस हा जगातील दोन क्रमांकाचा विषारी साप मानला जातो. त्याला ओळखण्याची सोपी खूण म्हणजे मातकट पिवळसर रंग. त्याच्यावर डोक्यापासून शेपटीपर्यंत रुद्राक्षाच्या माळेसारखे काळ्या रंगाचे ठिपके असतात. डिवचला गेला तर प्रेशर कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करतो. तो खूप लांबपर्यंत ऐकू जाऊ शकतो.

सापांविषयीचे गैरसमज?

साप दूध पितो. सगळेच साप विषारी असतात. धामणी शेपूट मारते. मांडूळ जातीच्या सापाला दोन तोंडे असतात.

हे खरे नाही. वर सांगितलेले चार साप सोडले तर बाकीचे साप चावून माणसाच्या जीवाला धोका नसतो. धामण पूर्णपणे बिनविषारी साप आहे आणि शेतकर्‍यांना फार उपयोगी आहे. मांडूळ जातीच्या सापाच्या शेपटीचा आकार तोंडाप्रमाणेच असतो.

सापाविषयी किंवा वन्यप्राण्याविषयी माहिती हवी असल्यास कुठे संपर्क साधावा?

1) वैभव भोगले -7276156656

2) अभिजीत महाले – ईको एको फ़ाउंडेशन, नाशिक, 9422750690

याच काळात साप दिसण्याचे प्रमाण का वाढते?

पावसाळ्यात दोन गोष्टी होतात. पहिले सापांची बिळे पाण्याने भरुन जातात. आणि दुसरे म्हणजे निसर्ग हुशार आहे. याच काळात बेडकांची पिल्ले मोठ्या प्रमाणात जन्माला येतात. याच काळात सापांची पिल्ले जन्माला येतात. निसर्गाची ती फूड चेन आहे. सापांना राहायला जंगल राहिलेले नाही. ते आता अर्बन इकोसिस्टिमवर मेन्टेन असतात. साप नष्ट झाले तर उंदरांची संख्या अमर्यादित वाढेल. ते माणसासाठी घातक ठरेल. उंदराच्या बिळात जाऊन त्याला संपवणारा साप हा एकमेव प्राणी आहे. त्यामुळे साप विषारी असेल तरच त्याला पकडायचा अट्टाहास माणसांनी करावा. बिनविषारी सापाला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या