
मुंबई | Mumbai
नोटांचे आकार, रंग आणि त्याची वैशिष्ट्य वारंवार बदलण्यात येत असल्याने चलनातील नवीन नोटा व नाणी ओळखण्यात अंध लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने अंधांना नवीन नोटा व नाणी सहज ओळखता यावीत, यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलली असा सवाल उपस्थित करत याबाबत तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश आरबीआयला दिले....
चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने उदय वारुंजीकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.. नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे हायकोर्टाने आर बी आय ला आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठा समोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी आरबीआयने अंधांची गैरसोय दूर करण्यासाठी अद्याप ठोस कार्यवाही केली नाही. याकडे याचिकाकर्त्यांवतीने अॅड. वारुंजीकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर अंध व्यक्तींना नवीन नाणी ओळखण्यात कशाप्रकारे अडचणींना तोंड द्यावे लागतेय, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले.
तसेच अंध व्यक्तींना सोईस्कर ठरण्याच्या हेतूने नवीन नोटा आणि नाण्यांमध्ये बदल करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याबाबत तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आरबीआयला देत याचिकेची सुनावणी 8 डिसेंबर पर्यंत तहकूब ठेवली.