सीईटीचे काय?
मुख्य बातम्या

सीईटीचे काय?

सात लाख विद्यार्थी विवंचनेत

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच राज्याच्या सीईटी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या. दोन महिने उलटूनही सीईटी सेलकडून परीक्षांबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झाली नसून या परीक्षा होणार की नाही, या विवंचनेत जवळपास ६ लाख ९६ हजार २५ विद्यार्थी आहेत.

बारावीनंतर तसेच पदवी पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. परंतु करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या प्रवेश परीक्षांची तारीखच निश्चित करणे अवघड झाले आहे. परिणामी या सीईटीच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या ६लाख ९६ हजार विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभे आहे.

सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलून, त्यांची तारीख भविष्यात जाहीर करण्याबाबतची माहिती सीईटी सेलने वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षी पदवी परीक्षेचा तसेच बारावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच या प्रवेशपरीक्षांचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे सीईटी सेलमार्फत विविध अभ्यासक्रमांच्या १३ प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले होते.

परंतु मार्चनंतर दिवसेंदिवस करोनाच्या प्रादुर्भावात वाढ होऊ लागल्यामुळे या तारखरांमध्ये बदल करण्यात आला होता. बदलांनंतर १५ जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सीईटी सेलमार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे आता सीईटीची तारीख कधी जाहीर होते, याचीच प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

निर्णय घ्या

प्रवेश परीक्षांच्या तारखांमधील बदल आणि सद्यस्थिती पाहता यावर्षी प्रवेश परीक्षाच रद्द होणार की काय? याबाबतची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे. ही चर्चा विद्यार्थी, पालकांपर्यंतही पोहचल्याने त्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. प्रवेश परीक्षा घ्यावी किंवा रद्द करावी, परंतु याबाबतचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com