जिल्हा निर्मितीसह प्रलंबित प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालू : आ.भुसे

जिल्हा निर्मितीसह प्रलंबित प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालू : आ.भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde )राज्याचा दौरा करणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज (दि. 30) मालेगाव ( Malegaon ) येथून होणार असल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मालेगावसह परिसरातील तालुक्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार्‍या मालेगाव जिल्हा निर्मितीसह मांजरपाडा प्रकल्प-2, नार-पार, अंबिका व औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी गिरणा-तापी खोर्‍यात वळवणे आदी प्रलंबित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. दादा भुसे ( MLA Dada Bhuse )यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

शिवसेनेत उठाव होऊन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतलेल्या एकनाथ शिंदे यांना मराठवाड्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील आमदार व खासदारांची भक्कम साथ मिळाली आहे. यामुळे समर्थन देणार्‍या आमदारांच्या पाठीशी आपण संपूर्ण ताकदीनिशी उभे असल्याचे दाखवून देण्यासह जनमत अनुकूल करण्यासाठी शिंदे यांनी राज्यात दौरे करण्यास प्रारंभ केला आहे.

वरिष्ठ मंत्री असलेले दादा भुसे, आ. सुहास कांदे यांच्याबरोबर खा. हेमंत गोडसे यांनी केलेली भक्कम पाठराखण लक्षात घेत आपल्या या दौर्‍याचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मालेगावची निवड केली आहे. उत्तर महाराष्ट्राची विभागीय प्रशासकीय आढावा बैठक नाशिकऐवजी मालेगावी आयोजित करण्यामागचा उद्देशदेखील हाच असल्याचे दिसून येत आहे. या दौर्‍यातून आ. भुसेंचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जनहिताच्या घोषणा मुख्यमंत्र्यांकडून होण्याची शक्यता असल्याने या दौर्‍याच्या फलनिष्पत्तीकडे मालेगावसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्हानिर्मिती करत गत चार दशकांपासून प्रलंबित असलेली ही मागणी मार्गी लावून मालेगावसह परिसरातील तालुक्यांचा विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त करावा.

गिरणा-तापी खोर्‍यातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपुष्टात येण्यासाठी मांजरपाडा प्रकल्प-2 व नार, पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी पूर्व वाहिनी केल्यास या भागातील पिण्यासह शेती सिंचनाचा पाणीप्रश्न सुटून गिरणा-तापी खोरे सुजलाम्-सुफलाम् होणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना मान्यता मिळावी.

मालेगाव महानगरपालिकेस अमृत योजना टप्पा-2 साठी पाणीपुरवठा वितरण योजनेसाठी 86.66 कोटी तर मलनिस्सारण योजनेकरता 459.46 कोटींचा निधी मिळावा. रिक्षा, ट्रक, टेम्पोसह इतर वाहनचालक तसेच फेरीवाले, हॉकर्स यांच्या उत्कर्षासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे.

महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांना साडेनऊ ते बारा टक्के दराने कर्जपुरवठा केला जात आहे. नियमित कर्जफेड करणार्‍या बचत गटांना सध्या तीन टक्के व्याजदरात मिळत असलेली सवलत पन्नास टक्के करण्यात यावी.

पर्जन्यवृष्टीने बाधीत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करत आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना कांदा अनुदान देण्यात यावे. तसेच बदलत्या हवामानामुळे डाळींब व द्राक्ष बागायतदार अडचणीत आल्याने त्यांनाही विशेष पॅकेज द्यावे.

यंत्रत्रमाग उद्योग मंदीमुळे अडचणीत सापडला आहे. यासाठी या उद्योगास आधार देण्याच्या दृष्टिकोनातून वीजदरात सवलत व बिगरव्याजी खेळते भांडवल उपलब्ध व्हावे. मालेगावी एकात्मता चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा व पुतळा उभारणीसाठी 2 कोटीचा निधी मंजूर करावा. तसेच आदिवासी व इतर स्थानिक बांधवांना उपजीविकेसाठी मच्छिमारीकरिता पाटबंधारे यांजनांमध्ये प्राधान्य द्यावे आदी प्रमुख मागण्या आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचे आ. भुसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com