Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआम्ही चालवू 'हा' पुढे वारसा..!

आम्ही चालवू ‘हा’ पुढे वारसा..!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आमचा पक्षीमित्रांचा ग्रुप मोठा आहे. त्यात शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. नोकरी करणारे आहेत. पण आमच्यात पक्षीमैत्र आणि निसर्गमैत्र हा समान धागा आहे.

- Advertisement -

नाशिक पक्षीमित्रांची मोठी परंपरा आहे. तो वारसा पुढे चालवायलाच हवा. ती जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे. ती आपण पार पाडली पाहिजे अशा भावना तरुण पक्षीमित्रांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये पक्षीमित्रांचे ग्रुप्स आहेत. त्यांचे पक्षी निरीक्षणाचे कार्यक्रम सुरु असतात. त्यातल्याच काही पक्षीमित्रांना बोलते केले तेव्हा त्यांनी पक्षीनिरीक्षण का करतो याच्या भावना व्यक्त केल्या.

जैवविविधता आणि पक्षी समाजाचा हिस्सा

मी सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. पक्षीनिरीक्षणाचा छंद मला मी बारावीत असतांना जडला. निसर्गाची ओढ वाटायला लागली. नेचर क्लबच्या संपर्कात आलो आणि रीतसर पक्षीनिरीक्षण आणि त्याचा अभ्यास करायला लागलो. त्यामुळे माझ्या सवयी बदलल्या. मी खूप पतंग उडवायचो. पण पतंगीच्या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होतात हे कळाले आणि पतंग उडवणे बंद केले. आता मी दर संक्रांतीला मांजामुळे जखमी झालेल्या पक्षांना वाचवायचे काम करतो. पक्ष्यांना बोलता येत नाही. आपणच त्यांना समजावून घेऊ शकतो. प्राणी आणि पक्षी समाजाचा हिस्सा आहेत. तो आपण जपला पाहिजे.

दर्शन घुगे.

आवड असल्यामुळे सवडही मिळते

मी बारावीला आहे. आम्ही वडाळीभोई येथे राहातो. आमच्या घरातील सगळ्यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे आणि त्यामुळे सगळे सवडही काढतो. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने सध्या आम्ही रोज पक्षी निरीक्षणाला जात आहोत. आमची छोटीशी शेती आहे. शेतीवर जातांना खूप पक्षी दिसायचे. मग त्यांच्या निरीक्षणाचा, फोटो काढण्याचा आणि चित्र काढण्याचा छंद जडला. पक्षी जगले पाहिले असे मनापासून वाटते. त्यासाठी काम करायला आवडते.

भाग्यश्री बेलेकर

पक्षांबरोबर वेळ घालवायला आवडते

मी आठवीत आहे. एकदा नेचर क्लबबरोबर पक्षी निरीक्षणासाठी आम्ही नांदूरमधमेश्वरला गेलो होतो. तेव्हापासून आवड निर्माण झाली. लॉकडाउनच्या काळात मी पक्ष्यांचे. चंद्राचे खूप फोटो काढले. त्यामुळे माझी प्रक्टिस झाली. फोटो काढते. गुगलवर टाकते. पक्षीमित्रांच्या ग्रुपवर टाकते. पक्षी कोणते आहेत ते शोधते. त्यांच्यातील फरक मला कळायला लागले आहेत. त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मला फार आवडते.

रिद्धी येवला

मी जखमी पक्षी रेस्क्यू करतो

माझी स्कुलबस आहे. 99 साली मी शाळेत होतो. त्यावेळी माझ्यासमोर एक शिक्रा पक्षी जखमी होऊन पडला होता. पुस्तकात डॉ. सालिम अली यांचा धडाही होता. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली. मग त्या शिक्रा पक्षाला वाचवले. तीच माझी जखमी पक्षांना वाचवण्याची सुरुवात होती. माझे पक्षी रेस्क्यू सेंटर आहे. 20 वर्षांपासून हे काम मी आनंदाने आणि आपुलकीने करतो आहे.

मनोज वाघमारे

- Advertisment -

ताज्या बातम्या