पाणीपट्टी वसुली खासगी संस्थांकडे?

मनपा आयुक्तांसमोर सादरीकरण
पाणीपट्टी वसुली खासगी संस्थांकडे?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे घरपट्टी( House Tax) व पाणीपट्टी( Water Bills) आहे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पाहिजे त्याप्रमाणात वसुली झालेली नाही. त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. एकीकडे मनुष्यबळाची कमी तर दुसरीकडे थकबाकीची सतत वाढणारी रक्कम अशा दुहेरी संकटातून मनपाला मार्ग काढावा लागत आहे. मध्यंतरी यासाठी विशेष अ‍ॅपची देखील निर्मिती केली होती. मात्र, त्याला देखील नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून आता महापालिका खासगी संस्थेच्या माध्यमातून पाणीपट्टी वसुली करणार आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर खासगी संस्थेच्या माध्यमातून पाणीपट्टी वसुली (Collection of waterbills through a private organization)व इतर कामांची प्रक्रिया कशा पद्धतीने होणार याबाबतचे प्रेझेंटेशन झाले.

नाशिक महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे प्रयत्न करूनही पाणीपट्टीची वसुली पाहिजे त्याप्रमाणात होत नाही. मात्र सर्वांकडूनच नियमित पाणीपट्टी बिले भरली जात नसल्यामुळे थकबाकीची रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये गेली आहे.महापालिकेने विशेष अ‍ॅप तयार केले असून या अ‍ॅपद्वारे थेट मोबाइल व्हॉट्सअपवर पाणीपट्टी बिलाची सोय केली आहे.

मात्र, त्याचा वापर देखील नागरिक करत नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. यासाठी तब्बल 2 लाख 12 हजार नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. घरगुती नळकनेक्शन धारकांना दर दोन महिन्यांनी तर व्यावसायिक नळ कनेक्शनधारकांना दर चार महिन्यांनी पाणीपट्टीची बिले दिली जाणे आवश्यक आहे.

पाणीपट्टी विभागाला सुमारे 350 कर्मचार्‍यांची आवश्यकता असताना फक्त सुमारे 96 कर्मचार्‍यांवर बिल वाटपाची धुरा आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून पाणीपट्टीचे बिल देण्यापासून वसुलीचे काम देण्यात येणार आहे. राज्यातील काही ठिकाणी अशा प्रकारे वसुलीचे काम सुरू असून नाशिक महापालिका देखील त्याच पद्धतीने काम करणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com