Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात आजपासून जलकुंभ स्वच्छता, शुद्धीकरण

जिल्ह्यात आजपासून जलकुंभ स्वच्छता, शुद्धीकरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या ( Zilla Parishad Nashik ) पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत (Water quality programs) बुधवार दि.25 मे ते 10 जून या कालावधीत जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता (Cleaning of water tanks)व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

यामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्याबाबतचे निर्देश सर्व गट विकास अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Zilla Parishad CEO-Lina Bansod )यांनी दिली.

ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे मूलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे सर्व जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण, टी. सी. एल. साठवणूक व नमुना तपासणी, साथीचे आजार इत्यादी विषय अत्यंत महत्वाचे आहेत. मान्सून सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान पूर्ण करण्यात येणार आहे.

यामध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेत वापरात येणार्‍या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्यातील स्वच्छता करणे व ज्या स्त्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते. त्याचे क्लोरीनेशन आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व जलसुरक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे व उपाययोजना राबविणे आवश्यक असून यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी व शाळेमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी जिल्ह्यात सलग पाचव्या वर्षी हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गावातील पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची (स्त्रोत ते शेवटच्या नळ जोडणीपर्यंत) तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करणे तसेच. पूरग्रस्त गावांमधील वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात अशा वेळेस गावातील इतर स्रोतांचा वापर करणेकामी पूर्व नियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी करून पाणी पुरवठा करणेस उपयोगात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा तसेच तालुकास्तरावरुन दैनंदिन स्वरुपात अभियानाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे.

अभियानासाठी गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, उपअभियंता (ग्रापापु) यांच्यासह ग्रामस्तरावरील कर्मचारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा तसेच ग्रामपंचायतींनी सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करून, त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख आँईलपेंटने नमूद करावी, पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टी.सी.एल. उपलब्ध राहील याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.

शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्व जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या 5 प्रमुख विभागांचा समावेश आहे. या अभियानात सर्व यंत्रणांनी सहभागी होऊन कोणताही जलजन्य साथीचे आजार होऊ नये, यासाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

– लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

- Advertisment -

ताज्या बातम्या