२२ गाव पाणीपुरवठा योजनेला घरघर; १५ दिवसांपासून पुरवठा बंद

 २२ गाव पाणीपुरवठा योजनेला घरघर; १५ दिवसांपासून पुरवठा बंद

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील मनेगावसह (Manegaon) २२ गाव पाणीपुरवठा योजनेचे तब्बल २२ लाखांचे वीजबिल थकल्याने वीज वितरणने (Power Distribution) योजनेचा वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून ऐन उन्हाळ्यात २२ गावांना पिण्याच्या (Water) पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे...

तालुक्यातील सर्वात मोठी पाणी योजना म्हणून या योजनेकडे बघितले जाते. अनेक वर्षे सुरळीत सुरू असलेली ही योजना आता वीजबिलाच्या घेर्‍यात अडकली असून ग्रामपंचायतींकडून (Gram Panchayats) थकित पाणीपट्टी वसूल होत नसल्याने वीजबिल भरण्यासाठी योजनेकडे पैसेच शिल्लक राहिलेले नाहीत. गेल्या दोन-चार वर्षांत अनेकदा या योजनेचा बोजवारा उडाला असून केवळ थकित वीजबिलामुळेच कित्येक वेळा योजना बंद ठेवण्यात येत आहे.

तालुक्यातील भोजापूर धरणातून (Bhojapur Dam) या योजनेसाठी पाणी उचलले जाते. तेथून हे पाणी दापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून पुढे २२ गावांना हे पाणी देण्यात येते. मात्र भोजापूर धरण परिसरातील जॅकवेलवरील विद्युत जलपंपाचे जवळपास १३ लाख तर दापूर येथील विद्युत पंपाचे नऊ असे २२ लाखांचे वीजबिल थकित आहे. हे वीजबिल केवळ मागील दोन वर्षांचेच आहे. त्याआधी योजनेचे तब्बल ५८ लाख वीजबिल थकित होते. मात्र मागील दोन वर्षांपासूनचे असणारे वीजबिज भरून योजना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली होती. योजनेतील भोकणी, गोंदे, दोडी बु. या तीन गावांची पाण्याची मागणी बघता काही महिन्यांपूर्वी सहा लाखांचे वीजबिल भरून योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकच महिन्यात योजना पुन्हा बंद पडली आहे.

भोजापूर धरणावरील विद्युत पंपाचे महिन्याकाठी जवळपास दोन ते अडीच लाख तर दापूर येथील विद्युत पंपाचे ४५ ते ५० हजारांचे वीजबिल येते. मात्र त्या तुलनेत नागरिकांकडून थकित पाणीपट्टी वसूल होत नसल्याची माहिती योजनेचे सचिव माधव यादव यांनी दिली. मुसळगावचे रवींद्र शिंदे हे या योजनेचे गेल्या दोन वर्षांपासून अध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्याकडूनही योजना वाचवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. ग्रामपंचायतींशी समन्वय साधून थकित पाणीपट्टी वसूल करणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र ते त्यात कमी पडत आहेत. तर या योजनेला नवसंजीवनी देण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेऊन थकित पाणीपट्टी भरणे आवश्यक असल्याचे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांचे म्हणणे आहे.

दहा दिवसांत सुरू

योजनेचे जवळपास २२ लाखांचे वीजबिल थकित असले तरी नुकतेच शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जुलै २०२२ पासून आजवरचे थकित वीजबिल भरल्यास विद्युत पंपांचा वीजपुरवठा सुरळीत होऊ शकणार आहे. योजनेचे जुलैपासून आजवर जवळपास १४ ते १५ लाखांचे वीजबिल होत असून यासाठी योजनेवरील पदाधिकार्‍यांना कुठल्याही परिस्थितीत १५ लाखांची थकित पट्टी वसूल करणे गरजेचे आहे. मनेगावमधून ५० हजार, भोकणीतून २० हजार तर दोडीमधून ४० हजारांची वसुली झाली असल्याची माहिती सचिव यादव यांनी दिली. येत्या १० दिवसांत प्रत्येक गावातील नागारिकांकडून थकित पट्टी वसूल करून १५ लाखांचे लाईट बिल भरण्याचे उद्दिष्ट असून तत्काळ योजना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यादव यांनी सांगितले.

थकित पाणीपट्टी

चापडगाव 11 हजार, दापूर 81 हजार, रामनगर 13 हजार, पाटोळे 22 हजार, मनेगाव 81 हजार, दोडी खु. 7 हजार, गोंदे 12 हजार, मुसळगाव 9 हजार, दातली 8 हजार, खोपडी 8 हजार, खंबाळे 21 हजार, शिवाजीनगर 7 हजार, दोडी बु. 12 हजार, पांगरी बु. 65 हजार, भोकणी 4 हजार, कुंदेवाडी 0, दत्तनगर 4 हजार, धोंडवीरनगर 8 हजार, आटकवडे 15 हजार अशा 20 गावांची जवळपास एका वर्षाचीच पाणीपट्टी 3 लाख 91 हजारांवर पोहोचली आहे. मागची थकबाकी तर लाखोत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com