Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापाणीपुरवठा योजनांना मिळणार गती

पाणीपुरवठा योजनांना मिळणार गती

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह जिल्ह्यातील इतर पाणीपुरवठा योजनांचा मंत्रालयात आढावा घेण्यात आला .

- Advertisement -

जिल्ह्यातील लासलगाव-विंचूरसह 16 गावे, नांदूरमध्यमेश्वर, खडकमाळेगाव, सारोळेखुर्द या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह येवले तालुक्यातील धुळगाव, भिंगारे सह 17 गावे, राजापूर व इतर 40 गावे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह जिल्ह्यातील इतर पाणीपुरवठा योजनांचा आढावा नाशिकचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात घेतला.

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीप्रसंगी भुजबळ म्हणाले की, लासलगाव-विंचूर हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने लासलगाव-विंचूर सह 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामाला मंजूरी देण्यात यावी. तसेच भिंगारे (ता. येवला) सह 15 गावे, राजापूर व 40 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा नव्याने प्रस्ताव मान्य करावा. नांदूरमध्यमेश्वर, खडकमाळेगाव व सारोळे खुर्द येथील पाणीपुरवठा योजनांचा जलजीवन मिशन कृती आराखड्यात समावेश करावा.

जिल्ह्यातील गावांच्या पाणीपुरवठा योजनांची गरजेनुसार कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करावीत अशी मागणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे केली. यावेळी ना. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांचा विभागाच्या अधिकार्‍यांनी आढावा सादर करावा.

बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, तसेच 16 गाव पाणीपुरवठा अध्यक्ष जयदत्त होळकर, सचिव शरद पाटील, लासलगाव ग्रा.पं.मा. उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, डॉ.विकास चांदर, पाणीपुरवठा विभागाचे मंत्रालय व नाशिक जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. भुजबळांनी जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर लक्ष घातल्याने उपस्थित गावच्या नागरिकांनी भुजबळांचे आभार मानले.

16 गावची साडेसाती संपणार

लासलगाव, विंचूर सह 16 गावांची पाणीपुरवठा योजना नांदूरमध्यमेश्वर धरणावरुन कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत या योजनेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जास्त वर्ष झाल्यामुळे ती जुनाट झाल्याने या योजनेचे पाईपला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे या गावांना कमी दाबाचा व दुषित पाणीपुरवठा होत आहे. तर या योजनेबरोबरच इतर गावातील योजनाही रखडल्या असल्याने भुजबळांनी आता या योजनांकडे लक्ष घातल्याने या योजनांची साडेसाती संपण्याची आशा निर्माण झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या