महिन्यातून एकदा पाणीपुरवठा

पाणीटंचाई संकटाने मनमाडकर हवालदिल
महिन्यातून एकदा पाणीपुरवठा

मनमाड । बब्बू शेख Manmad

पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने तसेच पालखेडचे आवर्तन मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने शहरात महिन्यातून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. आवर्तनाअभावी पुन्हा पाणीटंचाईचे संकट उद्भवले असल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने मनमाड वासीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणासह पाटोदा येथील साठवण तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी पालिका प्रशासनातर्फे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. यासाठी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला गेला. मात्र पालखेडचे आवर्तन सोडण्याचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे वागदर्डी व साठवण तलावातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेत नगरपालिका प्रशासनातर्फे मनमाडवासियांना महिन्यातून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाणीटंचाईचे शहर म्हणून ओळख असलेल्या मनमाड शहरावर आता पुन्हा पाणीटंचाईचे सावट गडद होवून हंडा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ सव्वालाख नागरिकांवर येवून ठेपली आहे.

महिन्यातून एकदा पाणीपुरवठा
नाशिकहून 'या' पाच शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु

महिनाभरातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने मनमाडवासीय पाणीबाणीने अक्षरश: त्रस्त झाले आहे. महिनाभर पुरेल इतके पाणी साठविण्यासाठी नागरिकांची धावपळ उडत आहे. साठवलेल्या पाण्यात काही दिवसानंतर अळी निर्माण होत असल्याने ते पाणी वापरण्यासाठी उपयोगात आणले जात आहे. पाणीटंचाईमुळे अनेक नागरीकांनी कूपनलिका देखील खोदल्या आहेत. मात्र पाण्यात क्षारची मात्रा जास्त असल्यामुळे ते पिण्यास योग्य नाही. मात्र पाणीटंचाईने बोअरवेलचे पाणी पिणे भाग पडत असलेल्या नागरिकांमध्ये पोटाचे विकार देखील वाढत आहे. पिण्याच्या पाण्याचा 20 लिटरचा जार 30 रुपयांना उपलब्ध होत असला तरी शहर गोरगरीब कामगारांचे असल्याने त्यांना दररोज 100 ते 200 रूपये जारचे पाणी विकत घेणे परवडणारे नसल्याने पिण्याचे पाणी आणायचे तरी कुठून? असा प्रश्न गोरगरीब जनतेस पडला आहे.

महिन्यातून एकदा पाणीपुरवठा
शालेय गणवेशाबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांनी केली 'ही' महत्वाची घोषणा; वाचा सविस्तर

पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या शहरवासियांच्या हालअपेष्टांमध्ये खंडीत वीजपुरवठ्याने भर घालण्याचे काम सुरू केले आहे. अकस्मात होणार्‍या वीजपुरवठ्याने नागरीक अक्षरश: हैराण झाले आहेत. 41 अंशावर पोहचलेले तापमान त्यातच खंडीत वीजपुरवठा यामुळे जिवाची काहिली होत असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

महिन्यातून एकदा पाणीपुरवठा
पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे वागदर्डी धरण तुडूंब भरून ओव्हरफ्लो झाल्याने यंदा पाणीटंचाईचे संकट जाणवणार नाही, अशी आशा शहरवासियांना होती. मात्र धरणातील पाण्याचा साठा झपाटयाने कमी होत असल्याने उपलब्ध पाण्यातून आवर्तन मिळेपर्यंत पाणीपुरवठा करणे गरजेचे असल्याने पालिका प्रशासनाने 15 दिवसानंतर होणार्‍या पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून ती महिनाभरावर नेणे भाग पडले आहे. मात्र या निर्णयामुळे पाणीटंचाईची तीव्रता भिषण होवून शहरवासियांवर पाण्यासाठी दाहिदिशा भटकंतीची वेळ आली आहे.

पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ते पाणी पाटोदा तलावात साठवणूक करण्यात येते त्यानंतर ते पाणी पंपिंग करून वागदर्डी धरणात घेतल्यानंतर शहरात पाणी पुरवठा केला जातो मात्र पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यास विलंब केला जात असल्यानेच पाणीटंचाईचे संकट उद्भवले आहे. पाटबंधारे विभागाच्या या कारभाराने धरण उशाला अन कोरड घशाला, अशी गत शहरवासियांची झाली आहे.

दरम्यान, पालखेडचे आवर्तन सोडण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे चालढकल केली जात असल्यानेच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. असे असतांना देखील याप्रश्नी राजकीय पक्ष अथवा इतर संघटनांतर्फे आवाज उठविला जात नसल्याने शहरवासियांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com