मातीबरोबरच पाण्याचेही परीक्षण व्हावे!

मातीबरोबरच पाण्याचेही परीक्षण व्हावे!

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

मनाच्या पक्वतेसाठी जशी अध्यात्मिक संस्कारांची (Spiritual rites) गरज असते, तसेच सुदृढ शरीर (Strong body), संस्कारक्षम मन (Receptive mind), विवेकी बुद्धी (Discretionary intellect) तयार होण्यासाठी मानवी शरीराला विषमुक्त अन्नधान्याची गरज असते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा मगदुल आणि रासायनिक खतांच्या भरपूर वापरामुळे जमिनीच्या एनपीके चा बॅलन्स आपण बिघडवला आहे. नत्र, स्पुरद, पलाश यांचे जमिनीतील प्रमाण घटले आहे.

जमिनीत त्यांचं समप्रमाण प्राप्त झालं नाही तर पेरलेली पिके (crop), फळबाग (Orchard), पालेभाज्यांना ते योग्य प्रमाणात मिळत नाही आणि मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जमिनीतल्या मातीचे परीक्षण (Soil testing) करणे गरज झाली आहे. यासाठी प्रयोगशाळा (Laboratory) आता खेड्यापाड्यापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. मातीतल्या ज्या घटकांची कमतरता आहे, त्याचं वर्गीकरण करुन शेतकर्‍यांनी (farmers) नत्र, स्पुरद, पलाश जे कमी असेल त्याचा समप्रमाणात वापर केला तर चांगल्या दर्जाची पिके घेऊन मानवी जीवनाला चांगली मदत करता येऊ शकते.

- अशोक महाराज घुमरे, सांगवी, ता. सिन्नर

पाण्याचेही परीक्षण व्हावे!

आपल्या जमिनीचा पोत टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतल्या माती (soil) आणि पाण्याचे परीक्षण (Water testing) करणे आणि सेंद्रिय शेतीकडे (Organic farming) वळणे गरजेचे आहे. शेतीला मोकळे पाणी देण्यामुळेही जमिनीची झीज होते. त्या ऐवजी ठिबक, सूक्ष्म सिंचनाचा (Drip, micro-irrigation) वापर केला तर ते फायद्याचे ठरते. एकाच प्रकारचे पीक न घेता वेगवेगळी पिके घेतली तर जमिनीचा कस टिकून ठेवण्यास हातभार लागेल. बांधावर वेगवेगळी झाडे लावली तर जमिनीची धूप कमी होते. त्याचबरोबर हिरवळीची खते वापरली तर जमिनीच्या सुपीकतेसाठी चांगले ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीला अधून मधून विश्रांती देणे गरजेचे आहे.

- सुदेश खुळे, अध्यक्ष, ग्रीन व्हीजन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, वडांगळी ता. सिन्नर

पिकांमध्ये बदल गरजेचा

गेल्या पंधरा-वीस वर्षांचा विचार केला तर जास्त उत्पन्नासाठी शेतकरी (farmers) रासायनिक खतांचा अति वापर करत आहेत. त्यातून जमिनीची सुपीकता कमी होऊन शेती नापीक होत आहे. पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. त्याचे अंश जमिनीत मिसळल्यानेही माती नापीक होते. जमिनीची सुपीकता टिकून ठेवणारे जमिनीतील सूक्ष्मजीव, नष्ट होतात. वारंवार शेती ओली ठेवून व वारंवार तिच तिच पिके घेतल्यामुळेही जमीन नापीक (Land barren) बनते. त्यासाठी पिकांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. जमीन नापीक बनली तर मनुष्य जातीबरोबरच इतर सजीव सृष्टी संपुष्टात येईल.

- विलास चंद्रभान पगार, अध्यक्ष, जाम नदी फार्मर्स प्रोडूसर कंपनी, पाथरे, ता. सिन्नर.

त्याला शेती कळली!

ज्याला माती कळली, त्याला शेती कळली अशी एक म्हण आहे. शेतीची सुपिकता (Fertility of agriculture) टिकून ठेवायची असेल तर आपल्याला मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. तो नैसर्गिक पद्धतीनेही कर्ब वाढवता येतो. हिरवळीची खते वापरून, सेंद्रिय खते वापरून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येईल. जैविक औषधही वापरता येतील. जीवाणू हा जमिनीचा आत्मा असून तो टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी व्हायला हवा. त्यांच्या अतिरेकी वापरामुळे शेती निकामी होऊ लागली आहे. नैसर्गिक शेतीचा वापर वाढायला हवा.

उसाचे पाचट अनेक शेतकरी जाळून टाकतात. मात्र, तेच पाचट उसाच्या सरीमध्ये, फळबागांच्या बेडवर टाकले तर त्यापासून ऊसाला लागणारे अन्न तयार होते. बाहेरून खत टाकण्याची गरज पडत नाही. या पाचटाबरोबरच पालापाचोळा, भुस यांची कुट्टी करून शेतात टाकल्यास मातीचा कर्ब व जिवाणूही वाढतील. पुढची पिढी आणि शेती वाचवायची असेल तर आपल्याला ऑरगॅनिक, विषमुक्त शेतीकडे वळले पाहिजे. सर्व शेतकर्‍यांनी या शेतीकडे वळणे गरजेचे आहे.

- कारभारी सांगळे, संचालक, देव नदी व्हॅली ऍग्रो प्रोडूसर कंपनी, लोणारवाडी, तालुका सिन्नर.

शेतीचे आरोग्य महत्वाचेच!

सुदृढ बाळासाठी त्याच्या आईचे आरोग्य चांगले असावे लागते. त्याचप्रमाणे शेतीत मुबलक उत्पन्न हवे असेल तर शेतीचेही आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. शेतीचा पोत म्हणजे निसर्गाचा पोत. निसर्गाचा समतोल मातीवर अवलंबून असतो. त्यामुळे मातीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. शेतीवर अवलंबून असणारे जीव, वनस्पती, सर्व मानवजात मातीच्याच आधारावर जगते. त्यामुळे शेतातील माती सर्व दृष्टीने आरोग्यदायी असणे गरजेचे आहे.

- मनोज शंकर वाजे, डुबेरे, ता. सिन्नर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com