नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण

जिल्ह्यात 109 गावे, वाड्यांना 52 टँकरने पुरवठा
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. गाव पातळीवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होत नसल्याने ग्रामीण भागात पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील 59 गावे व 50 वाड्या अशा एकूण 109 गाव व वाड्यांना 52 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याबरोबरच 33 विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. याद्वारे जिल्ह्यातील 97 हजार 344 ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे यावर्षी टँकरची संख्या कमी राहील, असे चित्र सुरुवातीला होते. दरम्यानच्या काळात अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता फार जाणवली नाही.मात्र,पंधरा दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही मागणी वाढली आहे.

ग्रामीण भागातील विविध ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले असून परिणामी पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर विशेषतः महिलांवर आली आहे. महिलांची ही वणवण कमी व्हावी,यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा,अशी मागणी दैनंदिन वाढत आहे.टँकर मंजुरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकार्‍यांकडे वर्ग करण्यात आले असून टँकर मिळण्यासाठीच्या प्रशासकीय अडचणी यामुळे दूर झाल्या आहेत.ग्रामस्थांकडून टँकरची मागणी होताच लवकर टँकर मंजूर होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध होत आहे.

येवल्यात सर्वाधिक टँकर

जिल्ह्यातील येवला तालुक्यात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून येवला तालुक्यातील 43 गावांसाठी 20 टँकर सुरू करण्यात आलेले आहे. याबरोबरच इगतपुरी 19 (5 टँकर), मालेगाव 15 (8 टँकर), बागलाण आठ (4 टँकर), चांदवड सात (4 टँकर), पेठ सात (5 टँकर), सुरगाणा आठ (4 टँकर) सिन्नर एक (एक टँकर) व देवळा एक (1 टँकर) याप्रमाणे 59 गावे व 50 वाड्या अशा एकूण 109 गाव व वाड्यांना 52 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com