...म्हणून बिवलवाडीत बोअरवेलला परवानगी नाही; पाणी टंचाईच्या झळा तीव्र; हंडाभर पाण्यासाठी दोन किमीची 'पायपीट'

...म्हणून बिवलवाडीत बोअरवेलला परवानगी नाही;  पाणी टंचाईच्या झळा तीव्र;  हंडाभर पाण्यासाठी दोन किमीची 'पायपीट'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ठाणे व नाशिक जिल्हाच्या हद्दीवर असलेल्या शहापूर तालुक्यातील बिबलवाडीत भीषण पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. येथील आदिवासी महिलांना महामार्गालगत असलेल्या अहिल्यादेवी यांच्या टोप बारवमधून हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे....

पाण्याचा टँकर न आल्यास इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथे 5 किमी वरून पाणी आणावे लागते. विशेष म्हणजे बिवलवाडी गाव हे उंच टेकडीवर वसलेले असल्याने याठिकाणी टँकर देखील जात नाही. तसेच या गावाखालून रेल्वे मार्गातील बोगदे असल्याने बोरवेल खोदण्यासाठी शासनस्तरावर परवानगी मिळत नाही.

यामुळे येथील आदिवासीना वर्षांनवर्षे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावाला पाणी टंचाईतून कायमची सुटका करायची असेल तर भावली पाणी पुरवठा योजना हा एकमेव पर्याय असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. अहिल्यादेवींची टोप बारव भागवते तहान सध्या बिबलवाडीची तहान कसारा घाटातील टोप बारव भागवत आहे.

गावापासून 4 ते 5 किमी अंतरात हा एकच पाण्याचा स्त्रोत आहे. कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाताना वाटेत ही बारव लागते. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’ असे आहे. घाट जेथे संपतो तेथेच उजव्या हाताला व घाटनदेवी मंदिरापासून 2 की.मी अंतरावर ही गोल घुमटाकार वास्तू दिसून येते.

बारव मुख्य रस्त्यातून ५० फूट अंतरावरच आहे . पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही बारव बांधली.

जवळपास 250 वर्षपुर्वी अहिल्याबाई होळकर यांचा कार्यकाळात या विहिरीचे बांधकाम झाले. कडक उन्हाळ्यातही या विहिरीला भरपूर पाणी आहे. शिवाय, इतक्या उंचावर, विहीरीला पाणी हा सुद्धा एक चमत्कारच वाटावा असे येथील अनेकांना वाटते.

४० फूट व्यासाची बारव पूर्ण दगडी बांधकाम सुबक पद्धतीने बांधलेली आहे. झाड-पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनवले आहे.

दगडी शिळा एकमेकांवर ठेवत घुमटासमान हे छत्र बनवताना बारवेच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचं काम केलेले दिसते.

बारवेत वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असते. घाटातील दोन वाड्यांतील महिला आजही वर्षभर याच बारवेच पाणी वापरतात. बारव किती खोल आहे, याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही. मात्र आजही बारव स्वच्छ व सुंदर असून तिच्यात थोडीही पडझड झालेली नाही.

बारवेवर कुठेही शिलालेख किंवा नक्षीकाम नाही. या घुमटी बारवेला किंवा "टोप बारवेला" स्थानिक लोक "राणी अहिल्यादेवींची बारव" या नावाने ओळखतात. स्थानिक धनगर समाजाचे युवक गेल्या चार ते पाच वर्षांपासून या बारवेची देखरेख करत आहेत.

असून पुरातत्व विभागाचे या ऐतिहासिक वास्तुकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. पुरातत्व विभागाने या वास्तूचे जतन करून हा ऐतिहासिक ठेवा जपावा अशी मागणी धनगर समाज करीत आहे. अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांमधील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोया व धर्मशाळा बांधल्या.जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत. कसारा घाटातील हि विहिर पाहून मनोमन अहिल्याबाईंच्या या कार्यास वंदन केले.

Related Stories

No stories found.