
दिल्ली | Delhi
दिल्लीत जंतर-मंतरवर कुस्तीपट्टूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी जंतर-मंतर इथं पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती दिल्लीमध्ये निर्माण झाली होती.
महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आंदोलक कुस्तीगिरांची रविवारी भारतीय किसान संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत, खाप महापंचायत २४ चे प्रमुख मेहर सिंह आणि संयुक्त किसान मोर्चाचे बलदेव सिंग सिरसा यांनी भेट घेतली. प्रत्येक खापचे सदस्य रोज सकाळी येथे येतील. दिवसभर आंदोलकांबरोबर राहतील आणि संध्याकाळी परत येतील, असे टिकैत यांनी सांगितले.
तसेच कुस्तीगिरांची समिती आंदोलनाबाबतचे निर्णय घेईल आणि आम्ही बाहेरून आंदोलनाला पाठिंबा देऊ, असेही टिकैत म्हणाले. आम्ही २१ मे रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. तोपर्यंत सरकारने काही निर्णय न दिल्यास आम्ही पुढील रणनीती आखू, असेही त्यांनी सांगितले.
कुस्तीगिरांच्या मागणीनुसार ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कलम १६१ नुसार सात महिला तक्रारदारांचे जबाब नोंदवले आहेत. आता कलम १६४ नुसार दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचे जबाब नोंदवणे बाकी आहे.